

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : अजिंठा अर्बन बँक घोटाळा (Ajintha Bank Scam) प्रकरणातील संशयित काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड (Subhash Zambad) यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या प्रकरणी वर्षभरापूर्वी झांबड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (दि.७) ते स्वतःहून पोलीस आयुक्त कार्यालयात शरण आले.
अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमेचा सुमारे ९७.४१ कोटींच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. तेंव्हापासून पोलिसांना चकवा देणारे काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य तथा बँकेचे अध्यक्ष संशयित सुभाष झांबड हे अखेर आज पोलीस आयुक्तालयात शरण आले आहेत. बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना झांबड चकवा देत होते. दोन वेळेस त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र तो देखील कोर्टाने फेटाळला होता. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहे.