

छत्रपती संभाजीनगर : जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अशा अनेक घोषणांचा जयघोष ऐतिहासिक शहर आग्रातील लाल किल्लातील जहांगीर महलात बुधवारी (दि.१९) घुमला. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व सहआयोजक महाराष्ट्र शासनाकडून सलग तिसऱ्या वर्षी हा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री एस. पी. सिंग बघेल, कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय, विधानसभेचे सभापती राम शिंदे, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, माजी मंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजकुमार चहेर, आग्र्याच्या महापौर हेमलता कुशवाह, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विनोद पाटील तसेच छावा चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय अभिजित देशमुख, दत्ता भांगे यांसह महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील विविध मंत्री, खासदार, आमदारही सहभागी झाले होते.
यावेळी आयोजक विनोद पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा शिवभक्त नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आग्रात शिवजयंती साजरी करण्यासाठी त्यांनी चार तासात होकार दिला. त्यानंतर अभिनेता विकी कौशल म्हणाला, निरंतर हे आयोजन होऊन मी दरवर्षी याचा हिस्सा असावा, अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नसून जगविख्यात एक विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी सुपरहिरो आहेत.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला बुधवारी (दि.१९) सकाळी अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी पाळणा गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मर्दानी खेळांचे सादरीकरण होताना उपस्थितांनी श्वास रोखून धरला होता. कोल्हापूर येथील ग्रुपने मराठा साम्राज्याचा प्रवास हे नाटक सादर केलं. यावेळी नाटक आणि शिवभक्तिगीते सादर करण्यात आले. आयोजन समितीने घेतलेल्या रील स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून आलेल्या शिवप्रेमींची यावेळी उपस्थिती होती.
बुधवारी सायंकाळपासून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित विशेष सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध गायक नितीन सरकटे आणि उत्कर्ष शिंदे यांचे राष्ट्रभावना जागवणारे गीतगायन, शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचे दमदार सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.