अजिंठ्यात मधमाश्यांचा धुमाकूळ! पाहणी दौऱ्याच्या दिवशीच ३० पर्यटक जखमी; प्रशासनाचा 'सुरक्षा' दावा फोल?

Honeybee attack : सोमवारी होणार पोळ्यांचे स्थलांतर
honeybee attack
शनिवारीही पर्यटकांना चादर गुंडाळून अजिंठा लेणीचे अवलोकन करावे लागले.
Published on
Updated on

सागर भुजबळ

फर्दापूर : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी येथे शनिवारी (दि.४) दुपारी भारतीय पुरातत्व विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाने मधमाशांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा केला. या पाहणीत मधमाशांच्या पोळ्यांचे सुरक्षित स्थलांतर व आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र, पाहणी सुरू होण्यापूर्वीच सकाळी सुमारे ११:३० वाजता मधमाश्यांनी पुन्हा पर्यटकांवर हल्ला केला. यात जवळपास ३० पर्यटक जखमी झाले. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

या पथकात कीटकशास्त्र व मधमाशी तज्ञ अजिंक्य पाटील, सचिन घमाट भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ सहायक संवर्धक अधिकारी मनोज पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्यासह दोन्ही विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. सोमवारी संयुक्त कारवाई करून आग्या मोहळाच्या पोळ्यांचे सुरक्षित रित्या स्थलांतरन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभाग व वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

दिवसभर मधमाश्यांचा धुमाकूळ

भारतीय पुरातत्व विभाग व वनविभागाच्या संयुक्त पाहणीनंतरही लेणी क्रमांक ९, १० व २६ परिसरात मधमाश्या आक्रमक झाल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून लेणी क्रमांक ८ जवळील पूल बंद करण्यात आला, तसेच लेणी क्रमांक ९ व १० काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली. पर्यटकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या समूहांना लहान गटांमध्ये विभागून केवळ दोन-दोन पर्यटकांना लेणी पाहण्याची परवानगी देण्यात आली. तरीही आग्या मोहळाच्या मधमाश्या पर्यटकांच्या आसपास घिरट्या घालत असल्याने दिवसभर पर्यटकांना अंगावर रुमाल, टोपी, शाल किंवा चादर गुंडाळूनच लेणीचे दर्शन घ्यावे लागले.

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दररोज देश-विदेशातून शेकडो पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी येतात. मात्र, मधमाशांच्या सततच्या हल्ल्यांमुळे अनेकांना लेणी न पाहताच माघारी फिरावे लागत आहे. काही पर्यटक जखमी होऊन उपचारासाठी धाव घेत आहेत, तर काहींना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळी अशी परिस्थिती निर्माण होणे, चिंताजनक मानली जात आहे.

दीर्घकालीन उपाय-योजनाची गरज

वारंवार घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. मधमाशांच्या पोळ्यांचे व्यवस्थापन, सुरक्षित मार्ग नियोजन किंवा प्रशिक्षित आपत्कालीन पथकाची नियुक्ती यापैकी कोणतीही प्रभावी पावले अद्याप दिसून येत नाहीत.

काय आहेत मूळ कारणे?

अजिंठा लेणी परिसरातील उंच कडे व शांत वातावरण परिसरातील पाणीसाठ्यामुळे मधमाशांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरात आग्या मोहळाचे पोळे अनेक ठिकाणी आढळून येतात. मानवी हालचाली उग्र सुगंध (पर्फ्यूम) गोंगाट व कंपणामुळे मधमाश्या आक्रमक होतात.त्यातच याठिकाणी तंज्ञानकडून नियमित निरीक्षण व नियंत्रण यंत्रणेचा अभाव असल्यामुळे मधमाशी हल्याच्या घटना नियमित घडत राहतात.

प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ

अजिंठा लेणीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष अजिबात ग्राह्य धरता येणार नाही. घटना घडल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी प्रतिबंधात्मक पावले उचलणे अत्यावश्यक आहे. आजपर्यंत घडलेल्या घटनांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे चित्र समोर आणले आहे. स्थानीय प्रशासनाला काही मर्यादा असल्याने भारतीय पुरातत्व विभाग व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आता तरी काही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात याठिकाणी आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'या' उपाययोजनांची गरज

मधमाशांच्या पोळ्यांचे तज्ज्ञांच्या मदतीने सुरक्षित स्थलांतर

प्रशिक्षित आपत्कालीन पथकाची नियुक्ती

पर्यटकांसाठी स्पष्ट सुरक्षा सूचना व मार्गदर्शन

धोकादायक भागात तात्पुरती प्रवेशबंदी

प्राथमिक उपचार केंद्र व अँब्युलन्स सेवा सज्ज ठेवणे

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत निरीक्षण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news