Ahmednagar Bribe Incident | 8 लाखांच्या लाच प्रकरणी नगर मनपा आयुक्तांवर गुन्हा

जालना एसीबीची अहमदनगरमध्ये मोठी कारवाई : आयुक्त पंकज जावळे पसार
Ahmednagar Municipal Commissioner
ब्रेकिंग न्यूज! लाच प्रकरणी अहमदनगर मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखलFile Photo

छत्रपती संभाजीनगर: अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह लिपिकावर ८ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जालना एसीबीच्या पथकाने आज २७ जून रोजी ही कारवाई केली. यामुळे राज्यात एकच खळबळ माजली असून कारवाईची चाहूल लागताच, मनपा आयुक्त पसार झाला आहे. एसीबी पथकाने त्याचं शासकीय निवासस्थान सील केलं आहे. स्वीय सहायक लिपिक श्रीधर देशपांडे याच्यामार्फत त्याने लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणात एसीबीने अहमदनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे (४७, मूळ रा. माजलगाव जि. बीड, ह. मु. शासकीय निवासस्थान, अहमदनगर) आणि लिपिक तथा स्वीय सहायक श्रीधर देशपांडे (४८, रा. अहमदनगर) यांच्यावर तोफखाना पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी गुरुवारी (दि. २७) दिली.

यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह फोर-के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नालेगाव येथे २ हजार २६०.२२ चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. त्या प्लॉटवर त्यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेत १८ मार्च रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र, परवानगीसाठी मनपा आयुक्त जावळे याने त्यांचा स्वीय सहायक देशपांडे मार्फत ९ लाख ३० हजाराच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना डॉ. जावळे आणि देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी जालना कार्यालयाकडे १९ जूनला तक्रार दिली. त्यावरून एसीबीच्या पथकाने १९ आणि २० जून, अशी दोन दिवस लाच मागणी पडताळणी केली असता देशपांडे याने तक्रारदार यांच्याकडे डॉ. पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी तडजोड करून ८ लाख रुपयांची लाचेची मागणी पंचा समक्ष केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त जावळे हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल केला.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, जालना युनिटचे सापळा अधिकारी उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांनी केली.

कारवाईची कुणकुण लागताच फरार ; दोघांची घर सील

पण एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही फरार झाले. महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर लाचलुचपत विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई सुरू केली होती. लिपिक श्रीधर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं शासकीय निवासस्थान लाचलुचपत विभागानं सील केलं आहे. ते जेव्हा समोर येतील त्यावेळी त्यांच्यासमोर या घराची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या कारवाईसंबंधीची मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news