छत्रपती संभाजीनगरात ई-कार पाठोपाठ रोल्स रॉईस फॅन्टम कारचीही नोंदणी
संभाजीनरः नुकत्याच जिल्ह्यातील पहिल्या इम्पोर्टेड ई-कारची नोंदणी येथील आरटीओ कार्यालयात झाली होती. या पाठोपाठ तब्बल १२ कोटींची रोल्स रॉईस फॅन्टम या कारचीही नोंदणी दसऱ्यानिमित्त शहरातील एका कंपनीच्या वतीने करण्यात आली. याचबरोबर इतर चार इम्पोर्टेड कारचीही नोंदणी झाली आहे. या वर्षभरात इम्पोर्टेड कारची संख्या १३ वर जाऊन पोहचली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
दसऱ्याला ४ हजार वाहनांची खरेदी
नुकतेच दसर्याच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी दुचाकीसह चारचाकी ४ हजार ५ वाहनांची खरेदी केली. याव्यतिरिक्त रोल्स रॉईस फॅन्टमसह मर्सडिज बेंन्झ, लॅम्बोर्गीनी, ऑडी यासारख्या तब्बल २१ कोटी ८३ लाख रुपयांच्या कारची नोंदणी करण्यात आली आहे. विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर शहरवासीयांनी दोन हजार ८६० दुचाकी तर ७१० कारसह विविध प्रकारची वाहने खरेदी केली आहेत. इंधनाचे वाढेत दर, त्याचबरोबर बी-६ वाहनांच्या वाढत्या किमती पाहता, आता वाहनधारक ई-वाहनांना पसंती देत आहेत. ई-वाहनांकडे वाहनधारकांचा कल पाहता विदेशी कंपन्याही भारतातील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. विविध फिचर्स आणि एका चार्जिंगमध्ये सुमारे एक हजार किलोमीटरचे अंतर पार करणारी पहिली इम्पोर्टेड ई कार शहरात काही दिवसांपूर्वीच नोंदणी झाली आहे.
कोट्यवधींच्या लक्झरी कार्सची नोंदणी
दसऱ्याला शहरवासीयांनी पाच इम्पोर्टेड कारची आरटीओ कार्यालयात नोंदणी केली. यात रोल्स रॉईस फॅन्टम कार किंमत १२ कोटी, मर्सडिज बेन्झ कार किंमत ४ कोटी, लॅम्बोर्गीनी दोन कार किंमत ५ कोटी, एक ऑडी कार किंमत ८३ लाख यांची नोंदणी केली.
इंधन कारकडे ओढा कमी
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या इम्पोर्टेड कार घेण्याकडे शहरवासीयांचा ओढा मोठा आहे. कमी किमतीत जास्त मायलेज आणि त्याहीपेक्षा जास्त फिचर देणारी ई-कार उपलब्ध असल्याने आता इतर इंधनावर चालणाऱ्या इम्पोर्टेड कारकडे ओढा कमी झालेला आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात जग्वार, लैंड रोव्हर, बीएमडब्लू, मर्सिडीज व इतर १३ इम्पोर्टेड कारची नोंदणी झाली आहे. यात ई- कारचाही समावेश आहे.