

छत्रपती संभाजीनगर : हडको एन-१२ येथील कचरा संकलन केंद्रात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी २४ तासांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला १२० तास उलटूनही प्रशासनाने अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. यामुळे सभापतींचे आदेश प्रशासनाने केराच्या टोपलीत टाकले की काय, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून कचरा संकलन केंद्र सुरू आहे. मागील आठवड्यात या केंद्रावर आंदोलन करत काम बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे आणि सुरेंद्र कुलकर्णी यांनी स्थायी समिती सभेत केली होती. त्यावर सभापती मकरिये यांनी प्रशासनाला २४ तासांत चौकशी करून गुन्हे नोंदवण्याचे कडक निर्देश दिले होते. सभेत एमआयएमचे नगरसेवक खान अब्दुल मतीन आणि मझहर पठाण यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला होता. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र, सभापतींनी हा विरोध झुगारून कारवाईचे आदेश दिले होते. पाच दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या दिरंगाईबाबत सभापती अनिल मकरिये यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थायी समितीच्या आदेशानुसार कारवाई निश्चितपणे होणार आहे. सध्या या प्रकरणाची तांत्रिक आणि कायदेशीर चौकशी सुरू असल्याने विलंब होत आहे. मात्र, प्रशासनाच्या या संथ भूमिकेमुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.