Sambhajinagar News : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ !

दारू पिऊन शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई; व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक शाखेने रिक्षा केली जप्त
Sambhajinagar New
Sambhajinagar News : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ !file photo
Published on
Updated on

Action taken against an auto-rickshaw driver transporting schoolchildren while under the influence of alcohol

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत तर्रर्र होऊन शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या एका मद्यधुंद रिक्षाचालकाचा व्हिडिओ बुधवारी (दि. १५) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने धडक कारवाई केली आहे. या बेजबाबदार रिक्षाचालकाला शोधून काढत पोलिसांनी त्याची रिक्षा जप्त केली असून, त्याच्यावर 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रदीप अशोक दाभाडे, असे मद्यपी रिक्षाचालकाचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

Sambhajinagar New
Illegal Sand Mining : खोरवड येथे अवैध वाळू उपशावर कारवाई; ६३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

शहरात एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एक रिक्षाचालक दारूच्या नशेत शाळकरी मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. शहागंज भागातील एका सुजाण नागरिकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.

रिक्षाचालकाला जाब विचारण्यात आला असता त्याने तुला काय करायचे ते कर, असे म्हणत शाळकरी चिमुकल्यांना घेऊन तेथून निघून गेला होता. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

Sambhajinagar New
jalna crime news : रिक्षात बसवून पैसे चोरणारे जेरबंद

त्यानुसार शहर वाहतूक शाखा-२ चे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक विलास बोडले, अंमलदार मडावी, नरोटे, ठोंबरे आणि अवकाळे यांच्या पथकाने या रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी रिक्षा चालक (एमएच २० ईके ९२१२) या क्रमांकाच्या रिक्षासह चालक प्रदीप अशोक दाभाडे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रदीप दाभाडे याची 'ब्रेथ अनालायझर' यंत्राद्वारे तपासणी केली असता, त्याने दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्यात आली आहे. त्याची रिक्षा जप्त करून छावणी मैदानात जमा करण्यात आली आहे.

मद्यपी रिक्षाचालकाचा परवाना रद्द करणार कोणत्याही रिक्षाचालकाने दारू पिऊन किंवा कोणतीही नशा करून रिक्षा चालवू नये. मद्यपान करून रिक्षा चालवताना आढळून आल्यास संबंधित चालकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच त्याची रिक्षा कायमस्वरूपी जप्त करून थेट परवाना रद्द करण्यात येईल. याशिवाय, सर्व रिक्षाचालकांनी त्यांना नेमून दिलेला पूर्ण गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. कोणीही विनागणवेश रिक्षा चालवू नये.
- मंगेश जगताप, पोलिस निरीक्षक, (शहर वाहतूक शाखा-२)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news