

Abortion Racket Broker and Lab Operator Behind Bars
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील राशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भपात रॅकेटमधील मुख्य दलाल मंगेश सुखदेव थोरात (४०, रा. जटवाडा रोड) याला गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. ३०) सकाळी अटक केली. ग्रामीण भागातील डॉक्टर आणि गर्भपात करणारी महिला यांच्यात दुवा म्हणून काम करत तो एका जिवाचा सौदा करण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांचे कमिशन उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या अटकेमुळे आता अनेक पांढरपेशे डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
सिटी चौक पोलीस ठाण्यात २८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मंगेशने थेट शिर्डी गाठली होती. तो तेथील संस्थानच्या एका खोलीत लपून बसला होता. मात्र, जवळील पैसे संपल्याने पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो गुरुवारी पुन्हा संभाजीनगरला येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.
या रॅकेटमध्ये मंगेशची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना शोधून त्यांना सुरक्षितपणे प्रत्यक्ष गर्भपात करणारी महिला शाहेदा परवीन हिच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. या काळ्या धंद्यातून त्याने मोठी माया जमवल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहाय्यक निरीक्षक रविकांत गज्जे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासासाठी आर- ोपीला सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीला ५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.