

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. यात कापणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून होत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला सादर करावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी धीर धरावा, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने एकही नुकसानग्रस्त शेतकरी झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, जिल्ह्यात ०१ ते ०३ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळ पिकांचे नुकसान झाले होते. १ ते ३ सप्टेंबर कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ०१ लाख ५६ हजार ४२ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. यासाठी २४३ कोटी २० लाख नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.