

पैठण : पैठण तालुक्यातील नवगाव येथे शेतातील रस्त्याच्या वादातून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना गुरुवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. कृष्णा जनार्दन साटोटे (वय ३२) रा. नवगाव ता. पैठण, असे तरूणाचे नाव आहे.
तालुक्यातील नवगाव येथील मृत कृष्णा जनार्दन साटोटे, अमोल कल्याणराव साटोटे, सुरेश अनंतराव चौधरी, ज्ञानदेव रामा साटोटे यांचा बाबासाहेब काशिनाथ ससाणे रा. तुळजापूर ता.पैठण यांच्याशी शेतातून रस्ता काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून दोन्ही गटांमध्ये मारामारी झाल्याने बाबासाहेब ससाणे यांनी पैठण पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यामुळे कृष्णा साटोटे याच्यासह पाच जणाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल झाल्याच्या निराशेतून कृष्णाने आपल्या शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले. याबात माहिती मिळताच पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय मदने, बीट जमादार नुसरत शेख, पोना नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, तांबे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ भेट दिली.