A woman riding a moped had her gold necklace weighing 4.5 tolas snatched away.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाहून मैत्रिणीसोबत मोपेडने घराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावले. ही घटना रविवारी (दि. २५) रात्री ९:२० वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील बेंबडे हॉस्पिटलच्या बाजूला घडली. फिर्यादी अर्चना अजयकुमार शुक्ला (४९) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती हे महापालिकेमध्ये नोकरीला असून, त्या साईबाबानगर, न्यू पहाडसिंगपुरा येथे कुटुंबीयांसह राहतात.
रविवारी रात्री अय्यप्पा मंदिरजवळ, विनायक अवस्थी येथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असल्याने त्या मैत्रीण लता दत्तात्रय त्रिवेदी यांच्यासोबत आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर दोघी मोपेडने रात्री ९:२० वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्याने दर्गाकडे जात असताना बेंबडे हॉस्पिटलजवळ येताच त्यांच्या मागून दुचाकीवर दोन जण आले. त्यातील मागे बसलेल्या चोरट्याने अर्चना यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांचे लॉंग गंठण (बाजारमूल्य सुमारे ७ लाख रुपये) हिसकावले.
अचानक गळ्याला हिसका बसल्याने अर्चना या घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे संग्रामनगर पुलाकडे पसार झाले होते. सुदैवाने महिला मोपेडवर पडून जखमी झाल्या नाहीत. सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.