

A speeding car ran over a motorcyclist.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : महावीर चौकातील उड्ड-ाणपुलावरून मध्यवर्ती बसस्थानकाकडे निघालेल्या सुसाट क्रेटा कारचालकाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका मोपेड स्वाराला अक्षरशः चिरडले. हा भीषण अपघात सोमवारी (दि.२२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पारगावकर हॉस्पिटल परिसरात घडला. या अपघातात अंदाजे ४५ वर्षीय इसम ठार झाला.
मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर कारचालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी डायल ११२ ला कॉल करून कळविले. त्यानंतर क्रांती चौक ठाण्यातील हवालदार मिठे, गायकवाड, पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी जखमी अवस्थेत इसमाला तात्काळ घाटीत हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त कार (एमएच २० एच बी ३८८४) ठाण्यात जमा केली.
रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. कारचालकाचेही नाव अद्याप निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिली. दरम्यान अपघाताच्या घटना वाढल्याने रस्त्याने प्रवास करणे देखील सर्वसामान्य नागरिकंना अवघड झाले आहे.