

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. एकीकडे त्यांनी जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत सहा वर्षांसाठी निलंबन केले, तर दुसरीकडे तुतारी हाती घेण्याच्या हालचाली वाढताच शरद पवार गटातूनही त्यांना तीव्र विरोध सुरू झाल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचा पक्ष प्रवेश आणि गंगापूरच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे तसेच 'चव्हाण यांना उमेदवारी दिली तर आम्ही वेगळा विचार करु' असा इशाराच एकनिष्ठांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये बंड केले. राष्ट्रवादीतील काही सहकारी आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. तेव्हा आ. चव्हाण हे अजित पवार यांच्या गटात गेले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिल्या फळीतील अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवारांनी दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना पुढे आणले.
ग्रामीण भागातील कार्यकर्ते पांडुरंग तांगडे पाटील यांना जिल्हाध्यक्ष केले. पडत्या काळात सतीश चव्हाण यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविरुद्ध प्रचंड खदखद आहे. दरम्यान, आमदार चव्हाण हे गंगापूर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची गेल्या दोन वर्षापासून तयारी करत आहेत. आता ही जागा अजित पवार गटाला सुटत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर चव्हाण यांनी शरद पवार गटात जाऊन तिकीट मिळविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
ही बाब राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत पडत्या काळात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खटकू लागली आहे. त्यामुळेच चव्हाण यांना जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. यापूर्वीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा चव्हाण यांना विरोध असल्याचे प्रकर्षाने समोर आले होते. खुद्द शरद पवार यांच्यासमोर जिल्हाध्यक्षांसह अनेकांनी चव्हाणविरोधी भूमिका घेतलेली आहे.
सतीश चव्हाण यांनी अचानक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. १८ ऑक्टोबर रोजी त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले. १५ ऑक्टोबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. आचारसंहिता लागताच आ. चव्हाण यांनी जाणीवपूर्वक महायुती सरकारविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आ. सतीश चव्हाण हे तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या. अशात ते शरद पवारांच्या भेटीला गेल्याचे समजताच जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. चव्हाण यांना पक्षात घेऊ नये आणि तिकीटही देऊ नये, असा सर्वांच्या तक्रारींचा सूर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.