

A heritage walk specially dedicated to senior citizens, organized by 'Shaharanama'
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सातारा गावातील खंडोबा मंदिर हे लाखो लोकांचे लाडके दैवत व श्रद्धास्थान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेल्या या मंदिरांची ख्याती सर्वदूर असली तरी बरेचदा या मंदिरात येणे होत नाही. खंडोबाच्या बारा स्थानांपैकी सातवे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिराचा इतिहास, मंदिराशी संबंधित आख्यायिका आणि इथले मुख्य सणांशी नव्याने परिचय करून देणारी माहिती शहरानामाच्या हेरिटेज वॉकमध्ये ज्येष्ठ नागरिक व इतिहास प्रेमींना मिळाली.
शहरनामाचा चौथा हेरिटेज वॉक शनिवारी सातारा गावातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात घेण्यात आला. विशेष म्हणजे यावेळचा वॉक खास ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित असल्याने यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतिहास व पुरातत्व विभाग, एमजीएम विद्यापीठ, आख्यान फाऊंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्ट आणि अडगाइड मीडिया प्रा. लि. व भारत पर्यटन, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी मिळून हा उपक्रम घेतला.
इतिहास अभ्यासक उमेश पटवर्धन, पुरातत्वविद आशुतोष पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. हेरिटेज वॉकची सुरवात मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या दांडेकरांच्या वाड्यापासून झाली. यावेळी वर्षा दांडेकर, आशिष दांडेकर व संदीप दांडेकर उपस्थित होते. संदीप दांडेकर यांनी इथल्या प्रसिद्ध गणपती मूर्तीची माहिती दिली. दरवर्षी खंडोबा मंदिरातील प्रतिमा दांडेकर वाड्यात आणल्या जातात.
विधीवत पूजा झाल्यावर त्या पुन्हा मंदिरात आणल्या जातात. त्यानंतर गावातीलच देखण्या गणपती बारव पाहिल्यावर खंडोबा मंदिरात आरती झाली. यावेळी उमेश पटवर्धन यांनीही दांडेकर वाड्यातील गणपती मूर्ती ही पहिल्या बाजीराव पेशवे याच्या पुजेतील मूर्ती असल्याचे सांगितले. आत्ताचे खंडोबा मंदिर हे अहिल्याबाई होळकरांनी १७६६ घ्या आसपास बांधले असल्याचे सांगितले.
मूळ मंदिर कडेपठारवर असून तेही मंदिर अतिशय अप्रतिम आहे, असे ते म्हणाले. मंदिराचे पुजारी विशाल धुमाळ यांनी मंदिराशी संबंधित आख्यायिका सांगितली. खंडोबा मंदिराचा इतिहास जाणून घेत ज्येष्ठ नागरिकही मंदिरात रमले होते. यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे व रमाकांत रौतल्ले, भारत पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्नेहल पाटील यांच्यासह एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद व भेंडे व टीम, राजश्री अग्रवाल, खंडोबा मंदिराचे सचिव साहेबराव पळसकर, स्थानिक विजय सोनवणे उपस्थित होते.