पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण येथील नाथसागर धरणामध्ये ३९ हजार ४२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्यामुळे आज (सोमवार) सकाळी दहा वाजता या धरणाच्या पाण्याची ८७. ७६ टक्केवारी नियंत्रण कक्षात नोंद करण्यात आली. या विषयीची माहिती धरण उप अभियंता विजय काकडे यांनी दिली. आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत कुठल्याही क्षणी गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागासह जिल्हा व तालुका, नगरपरिषद प्रशासनाने गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान (रविवार) रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. आजही पावसाने उघडीप घेतली नाही. यामुळे सलग दोन दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या विहामांडवा १२३, लोहगाव १०२, पाचोड ५९०,आडुळ ५९, नांदर १२४, बालानगर ६५, ढोरकीन ८३, बिडकीन ८९, पिंपळवाडी पिं ५७, पैठण ६७ मी.मी पाऊस या महसूल मंडळात झाला आहे. आतापर्यंत पैठण तालुक्यात एकूण ५९९० मी मी पाऊस झाला आहे.
या पावसामुळे गाव परिसरातील अनेक छोट्या- मोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उप अभियंता विजय काकडे यांनी नाथसागर धरणाच्या पाण्याची परिस्थिती संदर्भात जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना अहवाल सादर केल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी नीलम, बाफना तहसीलदार सारंग चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख या शासकीय विभाग प्रमुखाच्या माध्यमातून गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांना गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.