सिल्लोड : पाच हजारांची लाच घेणाऱ्या निलंबित सहदुय्यम निबंधकच्या घरात सापडले कोटींचे घबाड | पुढारी

सिल्लोड : पाच हजारांची लाच घेणाऱ्या निलंबित सहदुय्यम निबंधकच्या घरात सापडले कोटींचे घबाड

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : पाच हजारांची लाच घेतांना पकडण्यात आलेल्या सिल्लोड येथील सह दुय्यम निबंधक (रजिस्टार) यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरात लाच लुचपत विभागाने शुक्रवारी (दि. १ मार्च) रात्री छापे मारले. या छापेमारीत त्यांना १ कोटींची रोकड आणि २८ तोळे सोने, विविध बँकामध्ये मुदत ठेवी, एक चारचाकी वाहन, एक दुचाकी स्पोर्टस मोटारसायकल असे कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडले.

पोलीस निरीक्षक सचिन सांळुके यांनी पथकासह यशस्वी सापळा रचून सह दुय्यम निबंधक (रजिस्टार) छगन यु.पाटील यांना लाच घेतांना पकडले होते. या कारवाईनंतर पाटील यांच्या हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथील घराची घर झडती घेतली. यावेळी पोलिसांना बेहिशेबी संपत्ती आढळून आली.

रजिस्टार छगन पाटील यांनी पैसे घेऊन एकूण ४४ दस्तांची नोंदणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये एकूण ४२ दस्तांमध्ये जमीनींचे मूल्यांक1न कमी करून ४८ लाख ६ हजार २७३ इतक्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीचे शासनाचे नुकसान करण्यात आल्याचे देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. ८६ दस्तांमध्ये नोंदणी नियमांचा भंग केल्याने चौकशी अंती महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी त्यांना गुरुवारी (दि. २९) निलंबित केले होते. त्यानंतर १ मार्च रोजी ते सिल्लोड येथे लाच घेतांना पकडण्यात आले

पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकूंद अघाव, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, नंदकिशोर क्षीरसागर, अनिता इटुबोने यांनी केली आहे. सदर कारवाईकामी पोलीस हवालदार रविंद्र काळे, अशोक नागरगोजे, पो.अं. युवराज हिवाळे, मपोअं. आशा कुंटे, चालक पो.अ. चंद्रकांत शिंदे यांनी त्यांना मदत केली आहे.

Back to top button