Unseasonal Rains : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका; ७०९ कोटी ९२ लाखांचा निधी अपेक्षित | पुढारी

Unseasonal Rains : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका; ७०९ कोटी ९२ लाखांचा निधी अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी आता हातघाईला आला आहे. छत्रपती संभाजीनगरासह विभागातील आठ जिल्ह्यातील ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टरवरील कापसासह रब्बी पिके आणि फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. याचा थेट आर्थिक फटका मराठवाड्यातील ९ लाख ६७ हजार ५६१ शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या नुकसानीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे शासनाने घोषित केलेल्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदतीसाठी ७०९ कोटी ९२ लाख ४१ हजार रुपयांचा निधी लागणार आहे.

सन २०२२ मधील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका खरीप हंगामात शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तर २०२३ च्या हंगामात पावसाने दडी मारत शेतकऱ्यांना पुन्हा जोराचा धक्का दिला. जून महिन्याच्या शेवटी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जुलैमधे बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर आॅगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने कोरडेच गेले. गौरी-गणपतीच्या काळात झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांनी काहीकाळ तग धरला. परंतू त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे जिवंत झालेली पिके पाण्याअभावी कोमजली. पुढे रब्बी हंगामात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप, कापसासह रब्बी पिके आणि फळबागांना फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील ४ लाख ७६ हजार ७७८.९८ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

यासह ४ हजार २१८.७५ हेक्टरवरील बागायत क्षेत्र आणि १३ हजार ९२०.५७ हेक्टवरील शेतकऱ्यांच्या फळपिकांना फटका बसला. यात विभागातील एकूण ९ लाख ६७ हजार ५३१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान,
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७०९ कोटी ९२ लाख ४१ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. या निधीच्या मागणीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.

Back to top button