

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा शिवारात दारूच्या नशेत झालेल्या भांडणात मित्राचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. १२) घडली. शेख नबी शेख अब्दुल (५४, रा. मुल्ला गल्ली, हनुमान चौक, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडकाे ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीला अवघ्या दोन तासात अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
या प्रकरणात गणेश गोपीनाथ बकाल (४८, रा. चिकलठाणा) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, मृत नबीची पत्नी शेख शमिना शेख नबी या फिर्यादी आहेत. १२ डिसेंबरला आरोपी गणेश बकाल आणि आकाश हे दोघे नबी यांच्या घरी गेले. त्यांनी बकालच्या शेतात पाणी भरण्यासाठी व मोगरणी करण्यासाठी नबी यांना रात्री शेतात नेत असल्याचे शमिना यांना सांगितले. तेव्हा शमिना यांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही दोघेजण नबी यांना शेतात घेऊन गेले होते. १३ डिसेंबरला सकाळी ९ वाजेपर्यंत नबी हे घरी आले नाही. त्यामुळे शमिना यांनी आकाशला गाठून नबी यांच्याबाबत विचारणा केली. तेव्हा आकाशने गणेश बकाल व नबी हे दोघेच रात्री शेतात गेले होते, असे सांगितले. त्यानंतर नबी हे बकालच्या शेतात मृत झाल्याने त्यांना घाटीत दाखल केल्याची माहिती शेजाऱ्यांनी शमिना यांना दिली. त्यांनी तत्काळ घाटी दवाखाना गाठला. तेथे त्यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. तसेच, शवविच्छेदनातही मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आल्यावर शमिना यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी तत्काळ गणेश बकाल याला अटक केली.