

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुद्रांक विक्रेते ठरवून दिलेल्या जागी न बसता मर्जीप्रमाणे बसत असल्याची तक्रार एकाने केल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी नोंदणी विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ५) काही ठिकाणी तपासणी केली. मात्र, पथक आल्याचे पाहून मर्जी प्रमाणे बसणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांनी धूम ठोकली. यावेळी काही जणांकडील नोंदीची झाडाझडतीही पथकाने घेतली.
नोंदणी, मुद्रांक विभागाने शहरासाठी जवळपास ६५ जणांना मुद्रांक विक्रीचे अधिकृत परवाने दिले आहेत. या मुद्रांक विक्रेत्यांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी बसूनच मुद्रांकाची विक्री करावी लागते. परंतु शहरातील अनेक मुद्रांक विक्रेते मर्जीप्रमाणे बसतात. त्यामुळे नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी भटकावे लागते. तसेच १०० रुपयांचा मुद्रांक ११० रुपयांना विक्री करून नागरिकांची लूट केली जात असल्याची तक्रार राष्ट्रीय जनक्रांती सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी नोंदणी विभागाचे सहजिल्हा निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच काही विक्रेत्यांची नावेही दिली होती. या तक्रारीवरून सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी प्रशासकीय अधिकारी वंदना भूमकर यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथकाची स्थापना केली होती. या पथकाने मंगळवारी दुपारी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाच्या परिसरात तपासणी केली. मात्र पथक येत असल्याचे पाहून मर्जीप्रमाणे बसणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांनी पळ काढला. जे विक्रेते आढळून आले त्यांच्याकडील मुद्रांक आणि नोंदीची तपासणी करण्यात आली. एक विक्रेता त्याच्याकडील बॅगची तपासणी करण्यास नकार देत होता. त्याने पथकासमोरच काही मुद्रांक फाडूनही टाकले. पथक येणार असल्याची माहिती लीक झाली त्यामुळेच विक्रेते पळून गेल्याची चर्चा आहे. पथकामध्ये प्रभारी दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे, औदुंबर लाटे, प्रिया घुबे, दीपक रावळकर, शुभम गडवे, मधुकर क्षीरसागर यांचा समावेश होता.