छत्रपती संभाजीनगर : दोन कुटुंबाच्या वादात तिसऱ्याचा खून; पुंडलिकनगरात जुन्या वादातून तरुणाला चाकूने भोसकले | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : दोन कुटुंबाच्या वादात तिसऱ्याचा खून; पुंडलिकनगरात जुन्या वादातून तरुणाला चाकूने भोसकले

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये वाद सुरु असताना तेथे गेलेल्या तरुणाचा तिसऱ्याच आरोपींनी जुन्या खुन्नसमधून चाकूने भोसकून खून केला. पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर जवळील गुरुदत्तनगर येथे सोमवारी (दि. ६) रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी रात्रीतून पाच जणांना अटक केली आहे.

गणेश मारूती राऊत (२८, रा. गुरुदत्तनगरजवळ, साईमंदिर कमानीच्या बाजूला, गारखेडा परिसर), असे मृताचे नाव आहे. तर, सागर विक्रम केसभट (पाटील, २५), अमृता कमलाकर दीक्षित (२२), नीलेश कमलाकर दीक्षित (२४), गिरीजा कमलाकर दीक्षित (५०, सर्व रा. गल्ली क्र. २, गुरुदत्तनगर, शिवाजीनगरजवळ), शुभम मदन राठोड (रा. भारतनगर), अशी आरोपींची नावे आहेत. सागरविरुद्ध जिन्सी ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे. शुभमविरुद्ध जवाहरनगर आणि पुंडलिनगरात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

मृत गणेशची आई पूजा मारूती राऊत (५५) या फिर्यादी आहेत. त्यानुसार प्रिती राहुल मुळे (३२) आणि गिरीजा दीक्षित या समोरासमोर राहतात. कचरा टाकण्यावरून, भांडे धुतलेले पाणी टाकण्यावरून त्यांच्यात सतत वाद होतात. ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता त्यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच रात्री १०.४० वाजता पुन्हा वाद सुरु झाला. तेव्हा प्रिती मुळे यांनी त्यांच्या ओळखीचा गणेश राऊत याला बोलावून घेतले. तर, गिरीजाची मुलगी अमृता हिने आरोपी सागर केसभटला बोलावून घेतले. गणेश भांडणाच्या ठिकाणी येताच त्याने दीक्षित कुटुंबियांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांच्यावतीने भांडणासाठी आलेला सागर केसभट आणि शुभम राठोड यांनी गणेशला मारहाण सुरु केली. त्यांच्यासह दीक्षित कुटुंबियांनीही गणेशला मारहाण केली. त्याचवेळी सागरने गणेशच्या छातीजवळ चाकू भोसखून त्याचा खून केला. त्यानंतर सर्वजण सैरभैर झाले. हा आवाज ऐकूण राऊत कुटुंबिय घटनास्थळी गेले तेव्हा त्यांचा मुलगा गणेश सक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडला होता. मृत गणेश राऊत हा प्रिती मुळेच्या ओळखीचा आहे. तर आरोपी सागर केसभट हा अमृता दीक्षितच्या ओळखीचा आहे. मुळे आणि दीक्षित कुटुंबियांच्या वादात त्यांनी या दोन्ही तरुणांना बोलावून घेतले खरे, पण सागर आणि गणेश यांची जुनीच खुन्नस असल्याचे सांगितले जाते. गणेश राऊत हा त्या भागातील सर्वांच्या ओळखीचा चेहरा होता. त्याला अनेकजण मानत होते. सागरला नेमके तेच खुपत नव्हते. त्याने जुन्या वादातूनच गणेशला भोसकल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील करीत आहेत.

सागरच्या बापावरही खुनाचा गुन्हा

आरोपी सागर केसभटच्या वडिलांनी २०१० मध्ये पत्नीचा खून केलेला आहे. चारित्र्याच्या संशयावरून सातारा परिसरात पत्नीला पेटवून दिले होते. तेव्हापासून सागरचा बाप विक्रम केसभट हा जेलमध्ये आहे. सागरला मावशीने सांभाळले. तो पेट्रोल पंपावर काम करायचा. त्याला तीन बहिणी आहेत. दोघींचे लग्न झालेले आहे. बाप खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असताना आता मुलगाही खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला आहे. त्याचा सांभाळ करणाऱ्या मावशीला हे सर्व पाहून पोलिस ठाण्यात रडू कोसळले.

सागरच्या खिशात निघाल्या बटन गोळ्या

खून करून रात्रीच सागर आणि शुभम पसार झाले होते. मात्र, ते शहरातच फिरत राहिले. दरम्यान, पुंडलिकनगरचे निरीक्षक राजेश यादव सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, अंमलदार सुनील म्हस्के, गणेश डोईफोडे, संदीप बीडकर, दीपक देशमुख, कल्याण निकम, प्रशांत नरवडे, अजय कांबळे यांच्या पथकाने सागर आणि शुभमला अटक केली. ठाण्यात आणून त्यांची झडती घेत असताना सागरच्या खिशात चार बटन (नायट्रोसन) गोळ्या सापडल्या. बायजीपुऱ्यातील एका पंटरकडून ८०० रुपयांत त्याने ६ गोळ्या घेतल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या खाल्ल्या, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.

ठाण्यातच मावशीच्या पाया पडला

सागर केसभटला अटक केल्याची माहिती पोलिसांनी त्याच्या मावशीला दिली. तेव्हा मावशी ठाण्यात आली. बापाने आईला मारल्यानंतर बाप जेलमध्ये गेला. तेव्हापासून सागरला मावशीने सांभाळले होते. काम करून पोट भरण्याची शिकवण तिने दिली. मात्र, सागर थेट खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे समजल्यावर मावशी ठाण्यात येऊन त्याच्यासमोर रडू लागली. तेव्हा सागरने तू रडू नको. तू रडलेली मला पाहावत नाही, असे म्हणत पोलिसांदेखत थेट मावशीचे पाय धरले. आता माझी वाट पाहू नको, असे सांगत त्याने मी खुनाची कबुली दिली आहे, असे स्पष्ट केले.

Back to top button