छत्रपती संभाजीनगर : पैठण एमआयडीसीतून आणखी १६० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

drugs
drugs
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर / पैठण, पुढारी वृत्तसेवा : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि गुजरात पोलिसांनी उघडकीस आणलेल्या २५० कोटींच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आणखी १६० कोटींचे १०७ लीटर मेफेड्रॉनचे द्रव जप्त केले आहे. पैठण एमआयडीसीतील अपेक्स मेडिकेम प्रा. लि. कंपनीचे दोन्ही युनिट सील करून दोघांना अटक केल्याची माहिती डीआरआयने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. गेल्या २४ तासांपासून ही कारवाई सुरू होती.

.सौरभ विकास गोंधळेकर (४०, रा. उस्मानपुरा) आणि शेखर पगार (३४, पैठण), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गोंधळेकर हा कंपनी मालक असून पगार हा तेथील गोदाम व्यवस्थापक असल्याचे सांगितले जाते. आता आरोपींची संख्या चार झाली असून यापूर्वी जितेश हिनहोरिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक केली होती. ते सध्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

डीआरआय पथकाने पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी आणि वाळूज एमआयडीसीतील एका केमिकल्स कंपनीत छापा मारून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात जितेश हिनहोरिया आणि संदीप कुमावत यांना अटक केली. जितेशच्या घराची झडती घेऊन पथकाने तेथून २३.३२ किलो कोकेन, २.९६ किलो एमडी ड्रग्ज आणि ३० लाख रुपये रोकड जप्त केली होती. त्याचवेळी महालक्ष्मी कंपनीतून पथकाने ४.५ किलो मेफेड्रॉन, ४.३ किलो केटामाइन आणि ९.३ किलोंचे मेफेड्रॉनचे आणखी एक मिश्रण जप्त केले होते. दरम्यान, हिनहोरिया याने डीआरआयच्या ताब्यात असताना आत्महत्येचा प्रयत्न केल्याने काही दिवस तपास रखडला होता. आता हिनहोरिया आणि कुमावतला न्यायालयीन कोठडीत टाकल्यानंतर पथकाने कंपन्यांची झाडाझडती सुरु केली आहे. पैठण एमआयडीसी पथकाच्या रडारवर असून त्यांनी हिनहोरियाच्या संबंधित कंपन्यांची तपासणी सुरु केली आहे.

२४ तास झाडाझडती

पथकप्रमुख राेहित निगवेकर यांच्या नेतृत्वात डीआरआय पथकाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाडाझडती सुरु आहे. गेल्या २४ तासापासून हे पथक पैठण एमआयडीसीत तळ ठाेकून होते. त्यांनी अपेक्स मेडिकेम प्रा. लि. कंपनीच्या दोन्ही युनिटमध्ये छापा मारला. पथक आत गेल्यानंतर त्यांनी पूर्ण गेट बंद करून घेत तब्बल २४ तासांहून अधिक वेळ झाडाझडती घेतली. पथकाने बाहेर पडताना १०७ लीटर एमडी द्रव जप्त केले. त्याची किंमत १६० कोटी असल्याचे डीआरआय पथकाने म्हटले आहे.

नष्ट करण्याचा प्रयत्न

महालक्ष्मी कंपनीत डीआरआयचा छापा पडल्यानंतर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतरच अपेक्ष मेडिकेम कंपनीतील ड्रग्ज नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही पथकाच्या पाहणीत उघड झाले आहे. जे जप्त केलेले एमडी द्रव आहे ते तापविल्यानंतर त्याचेच पक्के एमडी बनविले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच पथकाने तेथे छापा मारून डाव उधळला, असे सांगितले जाते.

अपेक्स कंपनीतही हिनहोरिया कनेक्शन

अपेक्स मेडिकेम कंपनी पूर्वी जितेश हिनेहोरियाचीच होती. दीड वर्षांपूर्वी त्याने सौरभ गोंधळेकरला ही कंपनी विकली, असे सूत्रांनी स्पष्ट केले. सध्या जितेश त्या कंपनीत टेक्निकल डायरेक्टर होता, असेही डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दोन्ही आरोपी सिडको ठाण्याच्या कोठडीत

अटकेतील सौरभ गाेंधळेकर आणि शेखर पगार या दोन्ही आरोपींना डीआरआय पथकाने कॅनॉट भागातील कार्यालयात आणले. चौकशी करून त्यांना रविवारी संध्याकाळी अटक केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना सिडको ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. सोमवारी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल, असे डीआरआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

गोंधळेकरला केमिकल्सचे ज्ञान नाही

सौरभ गोंधळेकर संगणक अभियंता आहे. त्याला केमिकल्सचे ज्ञान नाही. मात्र, तो हिनहोरियाच्या संपर्कात आला. त्यानेच गोंधळेकरला सोबत घेऊन केमिकल कंपनी स्थापन केली. तेथे ड्रग्जची निर्मिती करून गुजरातसह परराज्यात विक्री केली. दरम्यान, छापा पडल्यानंतर गोंधळेकर हा पथकातील अधिकाऱ्यांना केमिकल्सबाबत माहिती विचारत होता. त्याला याबाबत काहीही माहिती नाही, असे तो सांगत होता. मात्र, आपल्या घरात येऊन कोणी दूध घेतो, चहा पावडर टाकून चहा बनवितो तर त्याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे, असे उदाहरण देऊन पथकाने त्याला याबाबत दोषी धरले आहे. तो वकिलपूत्र असल्याचेही समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news