Drugs Case : इंजिनिअर, एमबीए तरुणांचं डोक भलतचं चाललं; आयड्रॉपच्या नावाखाली बनविले कोट्यावधींचे ड्रग्ज | पुढारी

Drugs Case : इंजिनिअर, एमबीए तरुणांचं डोक भलतचं चाललं; आयड्रॉपच्या नावाखाली बनविले कोट्यावधींचे ड्रग्ज

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि अहमदाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या २५० कोटींच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल्स इंडस्ट्रीजमध्ये आय ड्रॉपचा कच्चा माल तयार करतानाच अंमली पदार्थासाठी लागणारी पावडर वेगळी करून ड्रग्जचे रॅकेट चालविले जात असल्याचे डीआरआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, वाळूज एमआयडीसीतील कंपनीत सोमवारी (दि. २३) पुन्हा सर्च ऑपरेशन राबविले. तेथे रसायन मोठ्या प्रमाणात सील केले आहे. यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

तर, मुख्य सूत्रधार जितेश प्रेमजीभाई हिनहोरिया हा केमिकल इंजिनिअर असून तो वाळूज एमआयडीसीतील एका केमिकल्स कंपनीत डायरेक्टर आहे. दुसरा आरोपी संदीप कुमावतचे शिक्षण बीए-बीएड आणि फायनान्समध्ये एमबीए असे असून हे दोघे पूर्वी एका कंपनीत सोबत नोकरीला होते. तेथेच त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी भागीदारीत महालक्ष्मी केमिकल्स इंडस्ट्रीज कंपनी सुरु केली. दोन वर्षांपूर्वी कुमावतने ही संपूर्ण कंपनी खरेदी केली होती. कुमावतचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. या कारवाईमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे.

गुजरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. त्याच्या तपासात जितेश हिनहोरियाचे कनेक्शन उघड झाल्यावर त्यांनी तब्बल २० दिवस पाळत ठेवून २२ ऑक्टोबरला दोन कंपन्या सील करीत 23 किलो कोकेन, ७.४ किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन, 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण आणि सुमारे 30 लाख रुपये रोकड, असा २५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. तसचे, जितेश हिनहोरिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक केली होती. पथकाने कंपनीतून घेतलेले ड्रग्जचे नमूने पॉझिटिव्ह आल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे. त्यांना परवानगी नसताना देखील ते ड्रग्ज बनवित असल्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जाते.

महिन्याला दहा किलो ड्रग्जची तस्करी

आरोपी जितेश हिनहोरिया हा मुख्य सूत्रधार असून त्याचे गुजरात कनेक्शन उघड झाले आहे. तो महिन्याला दहा ते १२ किलो ड्रग्ज परराज्यात विक्री करायचा. पाच-पाच किलोची पाकिटे असायची. तो मुंबई, गुजरात आणि मध्यप्रदेशात एमडीचा सप्लायर म्हणून ओळखला जातो. कोकेनचा कच्चा माल दक्षिण अमेरिकेतून यायचा. त्यावर छत्रपती संभाजीनगरात प्रक्रिया करून दिल्ली, अमेरिका, मुंबईत तस्करी केली जायची. युरोप व अमेरिकेतून केटामाईनचा कच्चा माल यायचा, अशी माहिती समोर आली आहे.

२० अधिकाऱ्यांचे पथक तळ ठोकून

ड्रग्ज कारवाईसाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुमक वाढविली आहे. जवळपास १५ ते २० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक छत्रपती संभाजीनगरात तळ ठोकून आहे. काही अधिकारी उपचार सुरु असलेला आरोपी जितेश हिनहोरिया याच्यासोबत रुग्णालयात असून काहीजण दुसरा आरोपी संदीप कुमावतची चौकशी करीत आहेत, तर काहींनी वाळूज एमआयडीसीतील गीता केमिकल्स कंपनीत पुन्हा सर्च आॅपरेशन राबविले. डीआआयने जोरकसपणे तपासाला सुरुवात केली आहे.

उपचारानंतर हिनहोरियाला कोर्टात आणा

मुख्य आरोपी जितेश हिनहोरिया हा डीआरआय पथकाच्या ताब्यात असताना त्याने कॅनॉट भागातील एका कार्यालयात खिडकीच्या काचेने गळा व मनगटावर कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर पोलिस बंदोबस्तात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे त्याला कोर्टात हजर केले. मात्र, त्याचा आवाज ऐकू येऊ शकला नाही. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. मुसळे यांनी त्याच्यावर उपचार सुरु असेपर्यंत त्याचा ताबा डीआरआयला दिला. तसेच, उपचार पूर्ण होताच त्याला कोर्टात हजर करा, असे आदेश दिले.

संदीप कुमावतला न्यायालयीन कोठडी

कुमावत हा दोन नंबरचा आरोपी आहे. तो मुधलवाडी, पैठण एमआयडीसी परिसरात राहतो. त्याला पैठणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २३ आॅक्टोबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली होती. २३ आॅक्टोबरला त्याला पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. मात्र, त्यांनी दुसऱ्यांना हजर करायचे असल्याने विशेष न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयनी कोठडी सुनावली.

Back to top button