

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मांडी अन् पायात चारवेळा चाकू खुपसून अज्ञाताने ४० वर्षीय मजुराचा निर्घृण खून केला. ही घटना हर्सूल टी पॉइंटजवळील फ्लोटिंग स्पिरिट हॉटेलसमोर ४ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खून कोणी आणि का केला? याचा हर्सूल पोलिस तपास करीत आहेत.
सुरेश हरिभाऊ जावळे (४०, रा. देहाडेनगर, अंबरहिल) असे मृताचे नाव आहे. तो मिळेल ते मजुरीकाम करून उदरनिर्वाह भागवीत होता. आईसोबत तो राहत होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. अधिक माहितीनुसार, राजू आसाराम प्रधान (४०, रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. मृत सुरेश जावळे हा राजू प्रधान यांचा आतेभाऊ होता. त्यांना सुरेश जावळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी गेले. तेथे गेल्यावर जावळेला पोलिसांनी घाटीत दाखल केल्याचे समजले. ते घाटीत गेले असता डॉक्टरांनी सुरेश जावळेला मृत घोषित केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक पोतदार करीत आहेत.