

400 bogus doctors operating in the city as skin specialists
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात ४०० पेक्षा अधिक बोगस डॉक्टरांनी स्कीन स्पेशालिस्ट म्हणून दुकानदारी मांडली आहे. त्यांच्याकडे त्वचा रोगतज्ज्ञांची कोणतिही वैध डिग्री नाही. तरीही ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. याबाबत पुराव्यासह मनपा आरोग्य विभाग, राज्य शासनाकडे तक्रार केली. मात्र कुठलीच कारवाई होत नसल्याची खंत रविवारी (दि.९) त्वचा रोगतज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे आता रुग्णांनीच पडताडणी करून योग्य डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यभरातील त्वचारोगतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणारी क्युटीकॉन महाराष्ट्र २०२५ ही राज्यस्तरीय परिषद १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान शहरात होत आहे. याविषयी माहिती देण्यासाठी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. गोविंद काळे, सचिव डॉ. प्रशांत पाळवदे, डॉ. आशिष देशमुख, डॉ. आशिष सोनारीकर आणि डॉ. मंजिरी देशमुख यांची उपस्थिती होती. त्वचारोग तज्ज्ञ म्हणून अनेक अनकॉलिफाइड डॉक्टर प्रॅक्टीस करत असल्याचे सांगताना हे तज्ज्ञ म्हणाले, छत्रपती संभाजीनगरात ५५ त्वचा रोगतज्ज्ञ हे योग्य वैद्यकीय शिक्षण घेतलेले गुणवत्ताधारक /डॉक्टर आहेत. तर ३०० ते ४०० अनकॉलिफाइड डॉक्टरांकडून चुकीच्या औषधोपचाराने रुग्णांच्या जीवाचा खेळ सुरू आहे.
शासनाची उदासीनता, आमचे प्रयत्न निष्फळ
कुठल्या स्कीनसाठी काय औषध, किती वेळ लावयाचे हे चुकले तर त्वचा जळते. फंगलसाठी स्टेरॉईड घेतो तर चांगले वाटते. परंतु त्वचा फाटते. हे घातक आहे. चुकीच्या औषधोपचाराने रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होणे. रिअॅक्शन होऊन दाखल करण्याची वेळ येते. हे गंभीर असल्याने याविरोधात आवाज उठवला. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे आमचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे डॉ. काळे म्हणाले.
तीनदिवसीय परिषदेत नवीन संशोधन
उपचारपध्दतीवर सखोल चर्चा या परिषदेच्या माध्यमातून त्वचा रोगशास्त्र क्षेत्रातील नवीन संशोधन, प्रगतिशील उपचारपद्धती आणि क्लिनिकल नवकल्पनांचा सखोल अभ्यास होईल. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे व्याख्यान, कार्यशाळा, चर्चासत्रे तसेच पोस्टर सादरीकरण होणार आहे.
कॅन्सर सारख्या घातक आजारावर दिल्या जाणारी औषधी, स्टेरॉईड ते त्वचेच्या समस्या घेऊन आलेल्या रुग्णांना सहज देतात. कुठलाही विचार करत नाही. हे गंभीर असल्याने संघटनेच्या वतीने या विरोधात मनपा आरोग्य विभाग, राज्य शासनाकडे या बोगस डॉक्टरांची नावे, त्यांनी रुग्णांवर केलेल्या चुकीच्या उपचारांचा पुरावा म्हणून प्रिस्क्रीप्शन सहीत तक्रारी केल्या. परंतु तीन वर्षांपासून अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. अनेक डेन्टीस्टही स्क्रीन स्पेशालिस्ट म्हणून औषधोपचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. आयएडीव्हीएल ही भारतीय त्वचारोगतज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना असून, सदस्यसंख्या १७ हजारांपेक्षा अधिक आहे. यापैकी सातशे सदस्य हे राज्यस्तरीय परिषदेत सहभागी होणार आहेत.