बामुच्या कार्यक्षेत्रातील ३५ महाविद्यालयांचे शटर डाऊन; प्रवेश बंदीच्या कारवाईनंतरही त्रुटींची पूर्तता नाही

बामुच्या कार्यक्षेत्रातील ३५ महाविद्यालयांचे शटर डाऊन; प्रवेश बंदीच्या कारवाईनंतरही त्रुटींची पूर्तता नाही

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल ३५ महाविद्यालयांचे शटर यंदा डाऊन झाले आहे. कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यापीठ प्रशासनाने अनेक महाविद्यालयांवर प्रवेश बंदीची कारवाई केली होती. काही महाविद्यालयांनी नंतर त्रुटींची पुर्तता केल्याने त्यांची प्रवेश क्षमता बहाल करण्यात आली. परंतु ३५ महाविद्यालयांनी त्रुटी दूर करण्याबाबत उदासिनता दाखविली. त्यामुळे तिथे प्रवेश बंदी कायम राहून एकही प्रवेश होऊ शकला नाही.

विद्यापीठ प्रशासनाने २०२३-२४ शैक्षणिक वर्षांसाठी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेश क्षमतेची माहिती मे २०२३ मध्ये जाहीर केली होती. ही जाहीर करताना विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांमध्ये कुशल मनुष्यबळ नाही, पायाभूत सुविधा नाहीत त्यांच्या प्रवेश क्षमता घटविण्याची कारवाई केली होती. तर काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना बंदी करण्यात आली होती. या कारवाईनंतर विद्यापीठाने महाविद्यालयांना आणखी एक संधी देत त्रुटींची पुर्तता करण्यासाठी ठराविक मुदत दिली. यात मुदतीत ज्या महाविद्यालयांनी कुशल मनुष्यबळ नियुक्त केले त्यांची प्रवेश क्षमता पुन्हा बहाल करण्यात आली. जून ते सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. प्रवेश प्रक्रियेनंतर आता विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रियेत सहभागी महाविद्यालयांचा आढावा घेण्यात आला. त्यात ४७४ पैकी ३५ महाविद्यालयांनी विद्यापीठाला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले. प्रक्रियेत सहभागच न घेतलेल्या अशा महाविद्यालयांची जिल्हानिहाय यादी तयार केली जात आहे. ३५ महाविद्यालयांनी यंदा विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत. त्यांचे प्रवेश शुन्य झाले आहेत. आता या महाविद्यालयांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.

कारवाईमुळे आठशेहून अधिक नियुक्त्या

विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्त केलेले नाहीत. म्हणून विद्यापीठाने २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी अशा महाविद्यालयांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर संबंधित महाविद्यालयांनी घाईघाईने प्राध्यापक नियुक्त केले. ही संख्या आठशेपेक्षा अधिकअसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. कारवाई करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्ह्यात ४७४ महाविद्यालये असून यातील ११५ महाविद्यालयेच अनुदानित आहेत. उर्वरित विनाअनुदानित तत्वावरील आहेत.

प्रवेश क्षमता नेमकी किती?

विद्यापीठाने अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबविले होते. त्याचा फटका सुमारे ८० महाविद्यालयांना कमीअधिक प्रमाणात बसला होता. ३७२ महाविद्यालयांमधील बीए, बीकॉम, बीएससी असे एकत्रित ३९३ अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आले होते. विविध महाविद्यालयातील ५३४ अभ्यासक्रमांचे प्रवेश घटविण्यात आले तर विविध महाविद्यालयात ९७३ अभ्यासक्रमांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर अनेक महाविद्यालयांना प्रवेश बहाल करण्यात आले. मात्र, सध्या विद्यापीठाअंतर्गत नेमकी प्रवेश क्षमता किती याची माहिती प्रशासनाकडेही नाही.

गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करता येणार नाही हे विद्यापीठाने आधीच जाहीर केलेले आहे. त्यानुसार प्रवेश बंदीच्या कारवाईनंतर अनेक महाविद्यालयांनी त्यांच्या त्रुटी दूर केल्या. त्या त्या प्रमाणात आम्ही त्यांची प्रवेश क्षमता बहाल केली. ३५ महाविद्यालयांनी मात्र प्रतिसाद दिला नाही. त्यांची प्रवेश बंदी कायम राहील. त्यांच्याकडे यंदा एकही प्रवेश झाला नाही. आता त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या जाणार आहेत.
– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news