Online Fraud Case : ऑनलाइन कर्जासाठी शोधाशोध पडली महागात

सायबर भामट्यांनी घातला २२.१४ लाखांचा गंडा; सातारा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
Online Fraud
Online FraudPudhari
Published on
Updated on

22.14 Lakhs of cyber scams; A case has been registered against three people in Satara police station

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: क्रेडिट कार्डचे थकलेले बिल भरण्यासाठी इंटरनेटवर ऑनलाइन कर्जाची शोधाशोध करणे एका ४९ वर्षीय खासगी नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे.

Online Fraud
Digital arrest scam money laundering : डिजिटल अरेस्टचा काळा पैसा पांढरा करणारा गजाआड

ऑनलाइन कर्ज देण्याच्या बहाण्याने एका बनावट कंपनीने या व्यक्त्तीची तब्बल २२ लाख १४ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक जून २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत झाली असून, याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात 'रिलायन्स कॅपिटल बँक'च्या कथित तीन मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनव शर्मा, दक्ष मेहता आणि अतुल शर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्या कथित बँक मॅनेजरची नावे आहेत. ४९ वर्षीय फिर्यादी हे आधीच क्रेडिट कार्डच्या मोठ्या कर्जाच्या विळख्यात सापडले होते. या आर्थिक गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ऑनलाइन कर्ज मिळते का, याबाबत इंटरनेटवर तपासणी केली.

Online Fraud
Beed Crime: सावधान! वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली 'महाठग' सक्रिय; डॉक्टरच्या मुलालाच लावला ५ लाखांचा चुना

त्यानंतर त्यांना 'रिलायन्स कॅपिटल बँक' या नावाने कॉल आला. सुरुवातीला ५ लाखांचे कर्ज मिळेल असे सांगून भामट्यांनी त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. त्यानंतर विश्वास संपादन करून थेट २५ लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आधीच कर्जाच्या गर्तेत असल्याने त्यांनी या मोठ्या कर्जासाठी होकार दिला.

२५ लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे भासवून कंपनीकडून कधी विमा (इन्शुरन्स), तर कधी सर्व्हिस फी (सेवा शुल्क) अशी वेगवेगळी कारणे देऊन सातत्याने पैशांची मागणी करण्यात आली. कर्जाची मोठी रक्कम लवकरच मिळेल या आशेने फिर्यादी या सर्व मागण्या पूर्ण करत गेले. असे करत करत त्यांनी भामट्यांच्या खात्यावर तब्बल २२ लाख १४ हजार २०० रुपये भरले. सायबर भामट्यांनी सांगितले की, तुमच्या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आता फाईल रिझर्व्ह बँकेत तडजोडीसाठी गेली आहे. तेथील न्यायाधीशांना मॅनेज करण्यासाठी ६ लाखांची गरज आहे. या भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने स्वतःची कार गहाण ठेवली. उर्वरित रकमेची इतर ठिकाणाहून जुळवाजुळव करून बँकेत भरणा केला.

स्वतःजवळील सर्व पैशांचे मार्ग संपल्यानंतर आणि कर्जाची रक्कम हाती न आल्याने फिर्यादीने एका नातेवाईकाकडे कारण सांगून पैशांची मागणी केली. तेव्हा त्या नातेवाइकाने बँक कर्ज देण्यासाठी कधीही एवढे पैसे आगाऊ मागत नाही, असे सांगून त्यांची समजूत काढली आणि त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट केले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने थेट सातारा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news