

छत्रपती संभाजीनगर : महिला बचत - गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी शहरात उभारण्यात येणाऱ्या 'उमेद मॉल'च्या प्रकल्पाला अखेर शाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी (दि. १६) १९ कोटी ९९ लाख ८८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी स्वतंत्र विक्री केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने राज्यातील पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २० कोटी रुपये खर्चुन उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची तांत्रिक छाननी पूर्ण झाल्यानंतर शासनाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी केला.
या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, बांधकाम समिती सभापती सचिन गरड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा डीआरडीएचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
सव्वादोन लाख कुटुंबे जोडली
जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत सुमारे २ लाख १५ हजार ५८९ कुटुंबांतील महिला जोडल्या गेल्या आहेत. महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी माल, अन्नप्रक्रिया पदार्थ, मसाले, धान्य, हस्तकला आणि विविध मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र, या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी आणि स्वतंत्र बाजारपेठेची गरज होती. उमेद मॉलच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
तळमजला अधिक दोन मजल्यांची इमारत
शहरातील नगर भूमापन क्रमांक २५८२ (शीट क्रमांक ३७) येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या जागेवर हा मॉल उभारण्यात येणार आहे. तळमजला अधिक दोन मजले अशी पर्यावरणपूरक इमारत प्रस्तावित असून, तिचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ ५ हजार १२४.२४ चौरस मीटर असेल. या इमारतीत विद्युतीकरण, आधुनिक लिफ्ट, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही आणि अग्निशमन सुविधांचा समावेश आहे.
सरकारकडून मार्गदर्शन मागवून निविदा प्रक्रिया | व पुढील कार्यवाही केली जाईल. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील बचत गटांना वर्षभर हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दर्जेदार उत्पादने तयार करणाऱ्या प्रत्येक बचत गटाला यात विक्रीची संधी मिळेल. तसेच, ग्राहकांची वर्दळ वाढावी यासाठी येथे बँका आणि इतर व्यावसायिक सुविधांचाही समावेश असेल.
- वासुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक