

18 gates of Jayakwadi raised two and a half feet, discharge into the vessel continues
पैठण, पुढारी वृत्तसेवा : एक आठवड्यापासून पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडे आहेत. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याने गुरुवारी (दि.२८) रात्री आठ वाजेदरम्यान धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे अडीच फूट उंचीपर्यंत उघडले. गोदावरीत ५६ हजार ५९२ क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती धरण उप अभियंता मंगेश शेलार यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
पैठण तालुक्यातील पडत असलेल्या पावसासह जायकवाडी धरणाच्या वरील भागांतून मोठ्या प्रमाणावर पाणी येथील धरणात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, ४७ हजार १६५ क्युसेक या वेगाने आवक येत असल्याने गेल्या आठवड्यापासून गोदावरी नदीपात्रात कमी-अधिक विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केलेले आहे.
पैठण ते नांदेड गोदावरी नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने गोदाकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचन औद्योगिकनगरीचा प्रश्न मार्गी लागला आहे. गुरुवारी वरील धरणांतून येणारी पाण्याची आवक वाढल्याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली.
धरणाचे अठरा दरवाजे दुपारपर्यंत एक फुटावरून दोन फूट उचलून ४७हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. येणार्या पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे गुरुवारी रात्री आठ वाजता अडीच फुटांनी खुले करून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे रात्री गोदा-वरीत ५६ हजार ५९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातील पाणीसाठा ९८.६२ टक्के झाला असून, पाणीपातळी १५२१.७५ फूट, तर ४६३.८२९ मीटरमध्ये नोंद झाली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत, तंत्रज्ञ गणेश खराडकर यांनी दिली आहे.