पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे दुसऱ्यांदा बुधवारी (दि. २५) उघडण्यात आले. गोदावरी नदीत १९ हजार ९१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाने सुरू केला आहे.
जायकवाडी धरणाच्या वरील भागांत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. येथील धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९९.४५ कायम ठेवून वरील धरणांतून येणाऱ्या पाण्याच्या आवक प्रमाणे गोदावरी नदीत पुन्हा एकदा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी धरणाचे २७ पैकी १४ दरवाजे अर्धा फूट व चार दरवाजे १ फूट उघडून गोदावरी नदीचा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पुन्हा एकदा गोदावरी नदी भरून वाहत आहे. बुधवारी सकाळी या धरणात एकूण २८९७.१०० दलघमी पाणीसाठा आहे. पाण्याची टक्केवारी ९९.४५ असल्याने येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढविण्याचे नियोजन नियंत्रण कक्षातून करण्यात आले. पर्यटकांनी धरण पाहण्यासाठी गर्दी केली आहे.