

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर धडकून १२ जणांचा बळी गेला. या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक रोखल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक आरोप केला जात आहे. त्यावरून दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांचे १५ ऑ क्टोबरला रात्री निलंबन केले. तर, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसह ट्रकचालकाला अटक केली.
सहायक परिवहन अधिकारी प्रदीप राठोड आणि नितीन गोणारकर, अशी अटकेतील आरटीओ अधिकाऱ्यांची तर, ब्रिजेशकुमार कमलसिंग चंदेल (वय ३२, रा. सलैय्या, शिवपुरी, मध्यप्रदेश), असे ट्रकचालकाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, १४ आॅक्टोबरच्या रात्री ब्रिजेशकुमार हा ट्रक (एमपी ०९ एचएच ६४८३) समृद्धी महामार्गावरील १२० वेग मर्यादेच्या लेनमधून चालवित होता. त्याला अगरसायगाव (ता. वैजापूर) शिवारात अचानक आरटीओंनी थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे चंदेलने ट्रक अचानक ८० किमीच्या लेनमध्ये घेतला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणारी टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०४- जीपी २२१२) ट्रकवर आदळली. यात टेम्पो ट्रॅव्हलरमधील १२ जण ठार तर २३ जण जखमी झाले. या प्रकरणी कमलेश दगडू म्हस्के ( वय ३२ वर्ष रा. इंदिरानगर, झोपडपट्टी, नाशिक) यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्याकडे देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांमुळे अपघात होऊन १२ बळी जाण्याची ही पहिलीच घटना असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
अपघातानंतर ट्रक थांबविणारे आरटीओ अधिकारी काही वेळातच अपघातस्थळाहून निघून गेले होते. मात्र, बराच वेळानंतर ते अपघातस्थळी आल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली. या आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी ट्रक थांबविल्याचा दावा केला. मात्र, समृद्धीवर वाहन थांबविण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट झालेला नाही. त्याचा तपास सुरु असल्याचेही कलवानिया म्हणाले.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच, रात्री ड्यूटीवर असलेल्या सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, अपघाताचे गांभीर्य लक्षात आल्यावर पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अतुल सावे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले.
समृद्धी महामार्गावर आरटीओ पथकाने ट्रक थांबविण्याचा इशारा केला. या इशाऱ्यामुळे ट्रक चालकाने वाहन बाजुला घेतले. त्यावेळी भरधाव वेगात आलेला टेम्पो ट्रॅव्हलर ट्रॅकच्या पाठीमागून आदळला असे सांगीतले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान येथील ट्रकला रस्त्याच्या कडेला उभे करुन तपासणी केली जात होती. त्यावेळी ट्रकला ओव्हरटेक करुन पुढे गेलेला दुसरा ट्रक काही अंतरावर गेला, त्या पाठोपाठ टेम्पो ट्रॅव्हलर होता, पुढे गेल्यानंतर समोरच्या ट्रकने लेन कटींग केली, त्यानंतर ट्रॅव्हलर ट्रकवर आदळला, अशी दुसरी बाजू सांगितली जात आहे. नेमके काय झाले या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.