

12 people from Marathwada stranded in the Gulf
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण आखातात युद्ध भडकले आहे. त्याचा फटका आता या देशांमध्ये फिरायला आणि कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांनाही बसत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तीघे जण दुबई येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन पर्यटकांचा तसेच तिथे कार्यरत एका सीएचा समावेश आहे.
अमेरिका- इस्त्रायलने शनिवारी इराणवर हल्ले चढविले. त्याला प्रत्यूत्तर म्हणून इराणने इस्त्रालयसह आखातील देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले. त्यामुळे इस्त्रायल, दुबई, अबुधाबी, कतार आदी ठिकाणची विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नितीन चिचाणी आणि कल्पना चिचाणी हे दाम्पत्य दुबई येथे फिरायला गेलेले होते. हे दाम्पत्य सध्या क्रिक हार्बर येथे अडकले आहे. यासोबतच शहरातील लोहकरे नामक सीए देखील दुबईत अडकले आहे. लोहकरे हे दुबई येथे काम करत असल्याची माहिती आहे.
हे सर्व जण सुरक्षित असून त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती कळविली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात अडकलेल्या नागरिकांनी किंवा त्यांचे निकटच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला त्याबाबत माहिती कळवावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. माहिती एकत्रितरित्या राज्य शासनास सादर करुन कार्यवाही सुलभ होईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
वैयक्तिक तपशील, पासपोर्टमध्ये जसे नाव आहे तसे पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक, स्थानिक यूएई फोन क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक, दुबईतील सध्याचे ठिकाण, अडकण्याचे कारण आदी तपशील सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातून दुबई व अबुधाबी येथे नोकरीनिमित्त गेलेले आठ जण तेथे अडकले आहेत. यात शहतरातील उत्कर्षा भीमराव इंगळे ही अबुधाबी येथे नोकरीनिमित्त गेली आहे.
इराणने दुबई आणि अबू धाबीवर मिसाइल व ड्रोन हल्ले केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून यूएईमध्ये हवाई वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक आणि इतर प्रवासी तिथे सध्या अडकले आहेत. हे युद्धजन्य परिस्थितीचा भाग आहे. इराणने अमेरिकेच्या आणि इजराइलच्या हल्ल्यांनंतर प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले आहेत. जालना जिल्ह्यातील आठ जण दुबई व अबुधाबी येथे अडकल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
जालन्यातील आठ, हिंगोलीमधील एक जालना येथील सात जण संयुक्त अरब अमिराती मधील दुबई तसेच अबुधाबी येथे अडकल्याची माहिती आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील एक जण दुबई येथे अडकला आहे. यासोबतच आणखीही असंख्य लोक तिथे अडकले असून जिल्हा प्रशासनांकडून त्यांची माहिती संकलित केली जात असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.