छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : जादा दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत, कृषी सेवा केंद्र चालकांचे परवाने निलंबित केले. 853 रुपये किंमत असलेले कपाशीचे बियाणे या विक्रेत्यांनी 1300 रुपयांना विकले, पथकाने डमी ग्राहक पाठवून ही कारवाई केली.
करमाड येथील स्वामी ॲग्रो एजन्सीज व श्रीनाथ ॲग्रो एजन्सीज अशी विक्रेत्यांची नावे आहेत. करमाड परिसरात कपाशीच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागास मिळाली होती, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील व जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी रविवारी (दि.१८) करमाड येथील स्वामी ॲग्रो एजन्सीज मध्ये डमी ग्राहक पाठविले. सीड वर्क्स कंपनीचे यु एस 7067 या वाणाची प्रत्यक्ष किंमत 853 रुपये इतकी असताना कृषी सेवा केंद्राने ते वाण तेराशे रुपयात विकले, तर श्रीनाथ अग्रो एजन्सी चालकाने तुलसी सीडचे कबड्डी या वाणाची किंमत 853 रुपये असताना बाराशे रुपयास विकले.
या दोन्ही कृषी सेवा केंद्र चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी मंगळवारी (दि.२०) हे आदेश काढले आहेत.