

सिल्लोड: पुढारी वृत्तसेवा: सिल्लोड ते भराडी रस्त्यावरील सूतगिरणी मैदानासमोर मेंढ्या चरत होत्या. यावेळी काही मेंढ्या रस्ता ओलांडीत होत्या, या दरम्यान, भराडीकडून सिल्लोडकडे भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच १९ झेड ५३०८) मेंढ्यांना चिरडले. यात १७ मेंढ्या जागीच ठार झाल्या. तर ८ ते १० मेंढ्या जखमी झाल्या आहेत. मेंढपाळ सुभाष गुंजाळ (रा. सिसारखेडा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या मेंढ्या होत्या.
या घटनेची माहिती मिळतात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुनील पाटील मिरकर, सिल्लोडचे नगरसेवक सुनील दुधे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मेंढपाळास आधार दिला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकास अटक केली. सदरील अपघातग्रस्त ट्रक चालक दारूच्या नशेत होता, असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
या घटनेत मेंढपाळाचे 17 मेंढ्या दगवाल्यामुळे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या मेंढपाळास पुन्हा उभे राहण्यासाठी तत्काळ मदत देण्याची मागणी नगरसेवक सुनील दुधे यांनी केली आहे.
हेही वाचा