

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या सोमवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षांचा निकाल बोर्डाच्या WWW.maharesult.nic.in या संकेतस्थळावर सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट आऊट घेता येईल.
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र(१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी ) पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ठ विषयात त्याने संपादीत केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळांकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वत: किंवा शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दि. २९ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.