

वाई बाजार: माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावर आसोली फाट्याजवळ आज (दि.१३) सकाळी एका बोअरवेल मशीन वाहक ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहूर तालुक्यातील कसारपेठ येथील लिंगू शंकर आडे (वय २८) आणि संजय तुकाराम येरमे (वय २३) हे दोघे तरुण आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. २६ बी.आर. ६३०९) माहूर येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून परत येत असताना, आसोली फाट्याजवळ वाईबाजारकडून माहूरकडे जाणाऱ्या भरधाव बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुणांच्या उजव्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. त्यांच्या मांडीच्या हाडांचा चुराडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी जखमींना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन बाभळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून दोघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने अपघाताची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.