

बीड : पक्ष माझ्या काकांचा नाही तर तुमच्याच काकांचा आहे, तो व्यवस्थीत सांभाळा असे प्रत्युत्तर भाजपा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. बीडमध्ये सोमवारी (दि.24) रोजी झालेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नाव न घेता तुझ्या काकाचे आहे का सगळे, असा सवाल केला होता.
बीड नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरु असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. इथे एकजण सगळेच ए बी फॉर्म माझ्याकडे द्या म्हणत होता, असे चालणार नाही, इथे काय सगळे तुझ्या काकाचे आहे का? असे म्हटले होते.
यावर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चुकीची माहिती देणारी बीडमधील टोळी आहे. त्यांना दिलेल्या माहितीवरुनच ते बोलत आहेत. मी या सर्व प्रकारांबाबत यापूर्वी अजित पवार यांची भेट घेतली, माहितीही दिली होती. परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. काल त्यांनी इथे काय तुझ्या काकाचे आहे का, असा प्रश्न केला. परंतु माझ्या काकाचे नाही तर तुमच्याच काकांचा पक्ष आहे, तो व्यवस्थीत सांभाळा आणि बीडमधून दिल्या गेलेल्या माहितीची खातरजमा करत चला असेही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.