बीड : गत पाच वर्षांच्या कार्यकाळात बीडच्या आमदारांना एक काम धड करता आले नाही. जे केले त्या कामांमध्ये ठेकेदारांकडून वाट्टेल तितकी टक्केवारी घेतल्याने कामे दर्जाहीन झाली. याचा उत्तम नमुना म्हणून जालना रोडच्या कामाकडे पाहता येईल. एका पावसात शहरातील हा रस्ता पाण्याखाली जात असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाला बीडचे आमदारच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.
बीड शहरातून जाणाऱ्या जालना रोडवरील जनता गॅरेजपासून साई पॅलेसपर्यंत करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. हे काम आमदारांनी श्रेय लाटण्यासाठी हस्तक्षेप करून घाईघाईत करून घेतले. परंतु, वाट्टेल तितकी टक्केवारी घ्यायची सवय झाल्याने या कामात डिव्हायडर उभारण्यात आले नाही. दुतर्फा नाल्या करण्यात आल्या नाहीत. परिणामी, झालेल्या पावसाने पाणी व्यवसायिकांच्या दुकानांसह घरांमध्ये शिरले.
डिव्हायडर नसल्याने अनेकदा गाड्या स्लिप होऊन अपघात होत आहेत. नागरिकांना होत असलेला त्रास आमदारांनी काम करताना केलेल्या हस्तक्षेपामुळे होत आहे. त्यांच्या काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीची फळे बीडवासियांना भोगावी लागत आहेत, असेही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
बीड शहरातील जनता गॅरेजपासून साई पॅलेसपर्यंत दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले आहेत. या नुकसानीचे पंचनमाने करून प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. क्षीरसागर यांनी केली आहे.