

माजलगाव : येथील सार्वजनिक वाहतुकीत तसेच माजलगाव व तेलगाव बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद यांच्या वतीने माजलगाव व तेलगाव बस स्थानकांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने संबंधित प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आगारप्रमुख, माजलगाव यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळून आले. तसेच सुरक्षारक्षक व पोलिस बंदोबस्ताचा अभाव असल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. बस स्थानकातील पोलीस चौकीची अवस्था अत्यंत दयनीय असून तिचा वापर वॉशरूम म्हणून होत असल्याचेही निदर्शनास आले.
महिलांसाठी अत्यावश्यक असलेला 'हिरकणी कक्ष' उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. आपत्कालीन परिस्थितीत मदतीची अडचण निर्माण होत असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. याशिवाय महिला हेल्पलाईन क्रमांकाचा फलक नसल्यामुळे महिलांना तातडीने संपर्क साधता येत नाही, अशीही तक्रार करण्यात आली.
महिलांसाठीचे स्वच्छतागृह बसथांब्यापासून दूर असून त्याची स्वच्छता समाधानकारक नसल्यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच बस स्थानक परिसरात खासगी वाहनांचे मुक्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. या सर्व बाबींचे जीपीएस फोटो पुराव्यासह प्रशासनाला सादर करण्यात आले असून, नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू असले तरी तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक सुविधा व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती माननीय आमदार तसेच शहर पोलिस स्टेशन, माजलगाव यांनाही देण्यात आल्या असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नीला देशमुख, डॉ. वरुणराज तौर, अर्चना जाधव, ललिता सोळंके, मीना कदम, सखाराम जोशी, संतोष पालकर उपस्थित होते.