Illegal liquor sales : गेवराई तालुक्यातील रोहितळच्या रणरागिणींचा एल्गार

दारू अड्ड्यावर महिलांची धाड : नशामुक्त गावसाठी उचलले धाडसी पाऊल

Illegal sale of liquor in Gevrai
Illegal liquor sales : गेवराई तालुक्यातील रोहितळच्या रणरागिणींचा एल्गारPudhari File Photo
Published on
Updated on

Women raid liquor den: A bold step taken towards an alcohol-free village

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : "दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात, लेकरांचे भविष्य अंधारात जाते आणि गावाची शांतता भंग होते," हे केवळ भाषणात ऐकण्याचे वाक्य नसून रोहितळच्या महिलांनी ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे अवैध दारूविक्रीला कंटाळलेल्या २० ते २५ महिलांनी रविवारी सकाळी एकजूट दाखवत थेट दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला. या धाडसी कारवाईने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून महिलांच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Illegal sale of liquor in Gevrai
इजतगावमध्ये वाळू माफियांवर पोलिसांचा प्रहार; उपविभागीय अधीक्षकांकडून धडक कारवाई

गेल्या अनेक महिन्यांपासून रोहितळ आणि परिसरात अवैध गावरान तसेच विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या. गावातील तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक संतुलन बिघडत होते. दारूच्या नशेत होणारी भांडणे, महिलांवरील मानसिक त्रास, शाळकरी मुलींना होणारा मनस्ताप आणि घराघरातील कलह यामुळे ग्रामस्थ विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. महिलांनी याबाबत अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या.

मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याची भावना वाढत गेली. अखेर "आता पुरे झाले" म्हणत महिलांनी स्वतःच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी महिलांनी एकत्र येत गावातील अवैध दारूविक्रीच्या मुख्य अड्ड्यावर धडक दिली. महिलांचा निर्धार आणि आक्रमक पवित्रा पाहून अड्ड्यावर उपस्थित काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, महिलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दारूचा मोठा साठा ताब्यात घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलांनी जप्त केलेला साठा पोलिसांच्या स्वाधीन केला आणि अवैध धंद्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली. "वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे गावाच्या भविष्यासाठी आम्हालाच पुढे यावे लागले," अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.


Illegal sale of liquor in Gevrai
Jalna Crime : महिनाभरात रुई गावात दोन खून; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

प्रशासनासाठी इशारा

महिलांना स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागणे ही बाब प्रशासनासाठी आत्मपरीक्षणाची आहे. अवैध दारूविक्रीसारख्या गंभीर प्रश्नांवर वेळेत आणि प्रभावी कारवाई झाली असती तर महिलांवर अशी वेळ आली नसती, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. रोहितळच्या रणरागिणींनी दाखवलेली एकजूट आणि धाडस हे केवळ एका गावाचे नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी जागृतीचे उदाहरण ठरले आहे. "व्यसनमुक्त गाव, सुसंस्कृत समाज" या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत महिलांनी उभारलेला हा एल्गार आता तालुक्यातील इतर गावांसाठीही प्रेरणेचा दीप ठरत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news