Beed Crime| ३० लाखांच्या खंडणीसाठी 'पवन चक्की'चे जेसीबी जाळून टाकण्याची धमकी

सुरक्षा रक्षकासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
Extortion Case | खंडणी
खंडणीचा गुन्हाPudhari News Network
Published on: 
Updated on: 

केज : ३० लाखांची खंडणी द्या, अन्यथा तुमचे जेसीबी जाळून टाकू, अशी धमकी देत आवादा पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या सुरक्षा रक्षकासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पवन चक्की प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील सर्व्हे नंबर ४९६, ४९७, ४९८, ४९९ आणि ५०० मधील प्रभाकर नारायण सारूक व त्यांची पत्नी प्रमिला सारूक यांच्या शेतात ‘आवादा एनर्जी प्रा. लि.’ कंपनीच्यावतीने पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता आवादा एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी विशाल जयप्रकाश शेलार, दत्ता टिंगरे, अक्षय टेकाळे, नितीन कांबळे व मजूर पोलीस संरक्षणात जेसीबी घेऊन कामासाठी गेले होते. काम सुरू असतानाच प्रभाकर नारायण सारूक व त्यांची पत्नी प्रमिला प्रभाकर सारूक यांनी तिथे येऊन बळजबरीने काम बंद पाडले.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जमिनीचा मोबदला (मावेजा) आधीच दिला असल्याचे सांगत काम न अडविण्याचे आवाहन केले. मात्र, संशयितांनी ३० लाखांची रोख रक्कम आणि मुलाला कंपनीत नोकरीची मागणी केली. जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर कामावर असलेली जेसीबी वाहने जाळून टाकण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर पोलिसांसमक्ष कंपनीच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात तीन आरोपींपैकी मच्छिंद्र प्रभाकर सारूक हा स्वतः आवादा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. त्यानेच आपल्या आई-वडिलांना फोन करून कंपनीचे काम बंद पाडण्यासाठी फूस दिल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे त्याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विशाल जयप्रकाश शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर नारायण सारूक, त्यांची पत्नी प्रमिला प्रभाकर सारूक आणि त्यांचा मुलगा मच्छिंद्र प्रभाकर सारूक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार खंडणीचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉस्टेबल उमेश आघाव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.