गौतम बचुटेः केज : नवऱ्या पासून विभक्त राहत असलेल्या पत्नीने तिच्या प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची खबळजनक घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथील पान मटेरीयलचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीची पत्नी ही एक वर्षापासुन त्याच्या पासून विभक्त राहत आहे. या दोघांमध्ये प्रॉपर्टीचा वाद सुरु असून तिचे अन्य एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेम सबंध आहेत.
१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास तिचा नवरा हा त्याच्या पान मटेरियलच्या दुकानावर असताना त्याची पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत विशाल दत्तात्रय मस्के आणि बाबा पठाण हे दुकानावर आले. त्याची पत्नी त्याला शिवीगाळ करु लागली. तेव्हा तो दुकानाचे बाहेर आला असता, विशाल दत्तात्रय मस्के, बाबा पठाण व त्याची मुलगी यांनी त्याला पकडले आणि पत्नीने तिच्या बॅगे मध्ये आणलेली पेट्रोलची बाटली त्याच्या अंगावर ओतली. काडी ओढुन नवऱ्याच्या अंगावर टाकत असतांना तो झटापट करुन तेथुन पळून गेला. त्यानंतर तो पोलीस ठाण्याकडे पळून जात असताना रस्त्यात एका सलुनचे दुकाना समोर उभे असलेल्या निखील समुद्रे, सुरज नाईकवाडे, करण हजारे यांनी त्याला अडवुन शिवीगाळ केली. तसेच त्याला लाथा-बुक्याने मारहाण केली. निखील समुद्रे याने चाकुने त्याच्या डाव्या हाताच्या वार केला. त्याच्या आराडाओरड्याने आजुबाजुच्या दुकानातील लोक बाहेर आले. तेव्हा समुद्रे याने तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन तेथुन निघुन गेला.
यासंदर्भात गुरुवारी (दि. १७) त्याने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून त्याच्या बायकोसह विशाल दत्तात्रय मस्के, बाबा पठाण, निखील समुद्रे, सिध्दी नितीन काळे, सुरज नाईकवाडे आणि करण हजारे सर्व रा. केज या सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे तपास करीत आहेत.