

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी X वर पोस्ट करत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात कसे आर्थिक संबध आहेत? याचे पुरावेच दिलेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची ८८ एकर एकत्र जमीन असल्याचा दावा त्यांनी केलाय.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र. जगमित्र शुगर्सचे ६ सातबारा मी डिजिटली डाउनलोड केले. त्यात मुंडे आणि कराड यांची एकत्र ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) असल्याचे दिसून आल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. ''हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.'' असे सांगत त्यांनी सातबाऱ्याच्या प्रती पोस्टसोबत शेअर केल्या आहेत.
"मित्र व्हावे ऐसे 'गुंडे', ज्यांच्या बळावर विजयाचे झेंडे!" हेच आहे सत्ताकारण? भय, भूक, भ्रष्टाचार...मुक्त करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपला मतदारांनी तिसऱ्यांदा सत्तेची संधी दिली! त्यात बीडही!! हेच केलं का मुक्त? की आश्वासनमुक्त झालात?'' असा सवालही दमानिया यांनी दुसऱ्या एका पोस्टमधून केला आहे.
२८ तारखेला बीडला पदयात्रा आहे. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करायला मी २८ तारखेला बीडला सकाळी ९.३० वाजता पोहोचणार आहे. वाल्मिक कराड याला अटक होईपर्यंत लढू. बीडची दहशत बंद होण्यासाठी लढू, असे आवाहनही त्यांनी सामान्य जनतेला केले आहे.
राज्यासह देशात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील तीन आरोपींना काल (दि.२३) न्यायालयाने सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी पोलिस महानिरीक्षकांमार्फत आणि तेथील येथील गुन्हेगारी विश्वाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते. बीड जिल्ह्यात अराजक निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र, ही अराजकता संपविली जाईल, जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला होता.