

बीड : अवघ्या बीड जिल्ह्यातील प्रशासन वाल्मीकच्या दावणीला बांधल्यासारखी आजची अवस्था आहे. ‘अण्णा’च्या मर्जीशिवाय कोणी अधिकारी बीडमध्ये येऊ शकत नाही की बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस आणि प्रशासन जणूकाही या ‘अण्णा’च्या उपकाराच्या ओझ्याखाली दबल्यासारखे त्यांचे वागणे जाणवते.
मंगळवार, दि. 31 डिसेंबर रोजी वाल्मीक हा पुणे सीआयडी कार्यालयात हजर झाला. त्यानंतर रात्री उशिरा केज न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, वाल्मीक हा बीड पोलिस ठाण्यात येण्यापूर्वीच अवघ्या बीड जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा या ‘अण्णा’च्या पाहुणचारासाठी सज्ज झालेली होती. त्याच्यासाठी पोलिस कोठडीत नवीन बेड मागविण्यात आले होते. नंतर पोलिसांनी हे बेड पोलिस कर्मचार्यांसाठी मागविण्यात आले असल्याचा खुलासा केला; पण जनता एवढी दूधखुळी नाही. राज्यातील कोणत्या पोलिस ठाण्यात पोलिसांना बेड पुरविले जातात? पण यंत्रणेने लाजलज्जा सोडली की, असले सगळे काही खपून जाते. वास्तविक, वाल्मीक याच्या गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याने निर्माण केलेली दहशत विचारात घेता, पोलिसांनी त्याची बीडमधून धिंड काढायला पाहिजे होती; पण पोलिसांनी तर त्याच्यासाठी पलंगाची व्यवस्था केली. बीडमधील ही असली पोलिस यंत्रणा या एकूणच प्रकरणाचा कसा तपास करणार आहे, त्याची झलकच यातून दिसते.
पोलिस आणि प्रशासकीय दरबारी वाल्मीकचा हा थाटमाट काही आजचा नाही. मागील वीस-पंचवीस वर्षांपासून त्याची बीडच्या जिल्हा पोलिसांवर आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेली दिसते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत बीडमध्ये कोण कोण पोलिस अधीक्षक आणि पोलिस अधिकारी होऊन गेले, कोणकोणत्या जिल्हाधिकार्यांनी बीडमध्ये काम केले, त्यांच्या त्यांच्या कालावधीत काय काय अपराध झाले आणि ते कसे दडपले गेले, याची सखोल चौकशी झाली तरी वाल्मीकचे साम्राज्य कसे वाढत गेले त्यावर प्रकाशझोत पडेल. कारण, आजही बीड पोलिस दलात आणि प्रशासनात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी हे वाल्मीक आणि त्याच्या ‘आका’च्या मर्जीतीलच आहेत.
वाल्मीकने एकापाठोपाठ एक गुन्हे करत जायचे आणि पोलिस यंत्रणेने त्यावर पांघरूण टाकायचे, अशा प्रकारामुळे बीड जिल्ह्यात वाल्मीक नावाचा भस्मासुर वाढत गेलेला दिसतो. अर्थात, ही सगळी किमया काही एकट्या वाल्मीकची नाही, तर त्याच्या शिरावर आपला राजकीय वरदहस्त ठेवणारे वेगवेगळे राजकीय नेतेही त्याला कारणीभूत आहेत. बहुतांश राजकीय नेते आपापल्या राजकीय सोयीसाठी असले ‘बाहुबली’ आपापल्या पदरी बाळगून असतातच; पण वाल्मीक नावाचा असला भस्मासुर सहसा कुठे आढळणार नाही.
वाल्मीक कराड हा एकाएकी किंवा रातोरात जन्माला आलेला नाही की वाढलेला नाही. मागील वीस-वर्षांपासून तोळामासा प्रमाणात तो वाढत गेला आहे. मागील वीस-पंचवीस वर्षांपासून त्याच्या ‘लीला’ जिल्ह्यातील जनता खुलेआमपणे बघत आणि भोगत आली आहे. आज बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी वाल्मीकविरुद्ध एल्गार पुकारलेला दिसतो आहे; पण आज एल्गार पुकारणारी हीच मंडळी मागील वीस-पंचवीस वर्षांत झोपा काढत होती काय, ज्या त्या वेळीच त्याला वेसन का घातली गेली नाही, हा महत्त्वाचा सवाल आहे.
आठ-दहा वर्षांपूर्वी परळी पोलिस ठाण्यात एक पोलिस उपनिरीक्षक होते. मात्र, हे महाशय कधीही पोलिस ठाण्यात दिसायचे नाहीत; तर ‘अण्णा’च्या दरबारातच त्यांचा राबता असायचा. रात्रंदिवस हे अधिकारी सावलीसारखे वाल्मीकसोबत असायचे. वाल्मीक गाडीत बसलेला असायचा आणि हे महाशय त्याच्या गाडीचा सारथी म्हणून मिरवायचे. या काळातही वाल्मीकचे काळे कारनामे आणि त्याची दहशत सुरूच होती. आता असल्या माणसोबत जर पोलिस अधिकारीच वावरत असतील, त्याची गाडी चालविण्याचे काम करीत असतील, तर जनता काय ते समजून जाते. यावरून बीड पोलिसांची ‘कर्तबगारी’ दिसून येते.
अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांनी लोकांची कामे शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित पडतात, त्यातही पुन्हा कायदेशीर कारणापेक्षा ‘फायदेशीर’ कारणांसाठी प्रलंबित पडलेल्या किंवा प्रलंबित ठेवल्या गेलेल्या कामांची यादीच मोठी असते. महिनोन्महिने आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून दमल्यावर अशी मंडळी वाल्मीकच्या दरबारात हजेरी लावायची आणि आपली गार्हाणी मांडायची. अशावेळी काम कायदेशीर की बेकायदेशीर याचा विचार न करता, वाल्मीकचा आदेश संबंधित अधिकार्याला सुटायचा आणि ते काम चुटकीसरसी मार्गी लागायचे. अशावेळी लोकही वाल्मीकच्या भजनी लागले आहेत.