

गजानन चौकटे
गेवराई ः फेब्रुवारी महिना सुरू होताच वातावरणात प्रेमाची एक वेगळीच ऊब जाणवू लागते. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत असून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘रोज डे’ने होत आहे. या दिवसापासून प्रेमाच्या आठवड्याला अधिकृत सुरुवात होत असल्याने बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी गुलाबांची रेलचेल पाहायला मिळत आहे.
‘रोज डे’ हा केवळ प्रेमी युगुलांसाठी मर्यादित नसून मैत्री, कृतज्ञता, सन्मान आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देत भावना व्यक्त करत असताना मित्र-मैत्रीण, आई-वडील, शिक्षक आणि सहकाऱ्यांनाही गुलाब देऊन स्नेह व्यक्त करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे या दिवसाला अधिक प्रसिद्धी मिळाली असून ‘रिल्स’, ‘स्टेटस’ आणि ‘पोस्ट’च्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याची नवी पद्धत रूढ होत आहे.
रोज डे साजरा करण्यामागे अनेक ऐतिहासिक संदर्भ सांगितले जातात. मुघल काळात बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाब अतिशय प्रिय असल्याने त्यांना रोज ताजे गुलाब पाठवले जात असत, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. तसेच इंग्लंडच्या व्हिक्टोरियन काळात प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब देण्याची परंपरा रूढ झाली. रोमन संस्कृतीतही गुलाब हे प्रेम, सौंदर्य आणि नात्यांतील पवित्रतेचे प्रतीक मानले जात होते.
या विविध परंपरांचा संगम म्हणजे आजचा आधुनिक ‘रोज डे’ होय.रोज डे निमित्त शहरातील फुलांच्या दुकानांमध्ये गुलाबांची विशेष मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. लाल, गुलाबी, पिवळे आणि पांढरे गुलाब विक्रीस येत असून बुके, हार्ट शेप अरेंजमेंट आणि गिफ्ट कॉम्बोची क्रेझ तरुणांमध्ये दिसून येत आहे. ऑनलाइन ऑर्डरचाही ट्रेंड वाढत असल्याचे व्यावसायिक सांगतात.
गुलाबांच्या रंगांमागील अर्थ
रोज डे निमित्त गुलाब देताना रंगालाही विशेष महत्त्व असते. लाल गुलाब - प्रेम, उत्कटता आणि सौंदर्याचे प्रतीक, गुलाबी गुलाब - कौतुक, कृतज्ञता व आदर दर्शवतो, पिवळा गुलाब - मैत्री, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक, केशरी गुलाब - ऊर्जा, उत्साह व आकर्षण व्यक्त करणारा रंग, पांढरा गुलाब - शांतता, शुद्धता आणि नम्रतेचे प्रतीक मानला जातो.एक छोटंसं फूल देऊन मोठ्या भावना व्यक्त करण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे अधिक दृढ होत आहे. प्रेम, मैत्री आणि सन्मान यांच्या रंगांनी नात्यांना नवसंजीवनी देणारा ‘रोज डे’ हा प्रेमाच्या आठवड्याची सुंदर सुरुवात ठरत आहे.
तरुणाईचे मत
गुलाब देणं म्हणजे केवळ प्रेम नाही, तर समोरच्या व्यक्तीबद्दलचा सन्मान व्यक्त करणं आहे असे महाविद्यालयीन विद्यार्थी आकाश खरात याने सांगितले तर एक छोटंसं फूल देऊन मोठ्या भावना व्यक्त करण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे अधिक दृढ होत असून प्रेम, मैत्री आणि सन्मान यांच्या रंगांनी नात्यांना नवसंजीवनी देणारा ‘रोज डे’ प्रेमाच्या आठवड्याची सुंदर सुरुवात ठरत आहे कसे कपीलेश्वर हादगुले याने सांगितले.