

बीड ः बीड शहराबाहेरून गेलेल्या सोलापूर-धुळे महामार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा अतिशय वर्दळीचा रोड असल्याने काम गतीने करण्याची गरज असताना कंत्राटार मनमानीपणे काम करत आहे. याबरोबरच हे काम करतांना नियमांचे पालन देखील केले जात नसल्याने वाहतुकीची कोंडी होत असून सोमवारी दोन-दोन तास एकाच जागेवर थांबण्याची वेळ वाहनचालकांवर आली होती. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर-धुळे महामार्गाला बीड शहरातून दोन बाजुंनी रस्ते जोडले गेलेले आहेत. बीडकडून संभाजीनगरकडे जातांना महालक्ष्मी चौक व बीडकडून सोलापूरकडे जातांना छत्रपती संभाजी महाराज चौकात हे रस्ते जोडले जातात. त्या ठिकाणी अपघाताची संख्या वाढल्याने उड्डाणपुल करण्याची मागणी होत होती. त्यानुसार पाठपुरावा झाला आणि कामही सुरु झाले.
सप्टेंबर 2025 मध्ये सुरु झालेल्या या कामासाठी अठरा महिन्यांची मुदत आहे. सोलापूर-धुळे हा महामार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने या ठिकाणी पुरेशा उपाययोजना करुनच काम होणे अपेक्षित होते, परंतु तसे काही झाल्याचे या ठिकाणी पहायला मिळत नाही. कंत्राटदाराने एकाच लेनवर दोन्ही बाजुची वाहतूक वळवत मध्ये डीव्हायडर म्हणून चक्क माती भरलेली पोती ठेवली आहेत.
यामुळे अपघाताचा धेाका तर वाढतोय याबरोबरच काही बेशिस्त चालक दुसऱ्या लेनमधून पुढे गेल्याने वाहतूकीची कोंडी देखील होत आहे. यावर उपाययोजना केल्या जात नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजुला भराव टाकून तो समांतर केल्यास काही वाहने त्यावरुन जाऊ शकतील, त्या दिशेने देखील उपाययोजना करण्याची गरज आहे.
याबरोबरच महामार्ग पोलिसांनी देखील या ठिकाणी सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाहतूकीची कोंडी कशी टाळता येईल, यासाठी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि कंत्राटदाराच्या अभियंत्यांशी देखील चर्चा करुन उपाययोजना करणे गरजेचे आहे, परंतु असे होतांना दिसत नाही. यामुळे दोन-दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ बीडकरांबरोबरच महामार्गावरून गतीने प्रवास होईल या अपेक्षेने निघालेल्या हजारो प्रवाशांवर येत आहे.
डिव्हायडर म्हणून माती भरलेली पोती!
बीड बायपासवर उड्डाणपुलाचे काम करताना एकाच लेनमधून वाहने सोडण्यात आली आहेत. या लेनवर डिव्हायडर म्हणून चक्क माती भरलेली पोती ठेवण्यात आले आहेत. यामुळे अपघाताचा धोका तर वाढला आहे, याबरोबरच बेशिस्त वाहनचालक दुसऱ्या लेनमधून घुसल्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. या ठिकाणी एखादा भीषण अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
टेंडर 47 टक्के बिलो!
बीड बायपासवर उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने टेंडर 47 टक्के बिलोने भरलेले आहे. यामध्ये तांत्रिक बाबी उपस्थित करुन नंतर ते अधिक रकमेचे केले जाते हा भाग वेगळा. परंतु एवढ्या कमी दरात हा कंत्राटदार काम करत असल्याने कामाची गुणवत्ता कायम ठेवली जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काही महत्त्वाचे काम गेल्या दोन - तीन दिवसांत सुरू होते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी या भागात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ती आता होणार नाही अशी उपाययोजना आम्ही करत आहोत. दोन दिवसांत या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, अशी उपाययोजना केली जाणार आहे
स्वानंद पाटोदकर , अभियंता