

MLA Suresh Dhas Video Walunj bhairavnath yatra
आष्टी (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील भैरवनाथाची यात्रा अभूतपूर्व उत्साहात पार पडली. अनेक वर्षांनंतर छबिना मिरवणुकीत २० ते २५ फडांतील नृत्यांगनांच्या तालाला चक्क आमदार सुरेश धस यांनी ढोलची साथ दिली. यावेळी आ. धसांचा ढोल आणि नृत्यांगनांच्या घुंगरांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. याचा वहिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाळुंज येथील भैरवनाथाची यात्रा ही चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी दरवर्षीप्रमाणे भरवली जाते. यात्रेत आष्टी तालुक्यासह शेजारील जिल्ह्यांमधूनही हजारो भाविकांनी वाळुंज येथे गर्दी केली होती. यात्रेची खास परंपरा असलेल्या संध्याकाळच्या छबिना मिरवणुकीत भैरवनाथाच्या पालखीसोबत नृत्यांगनांचे नृत्य सादर करण्याची जुनी परंपरा यावर्षी पुन्हा सुरू करण्यात आली. काही वर्षांपूर्वी ही प्रथा न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आली होती. मात्र गावकऱ्यांच्या आग्रहानंतर आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेत ही परंपरा पुन्हा सुरू केली.
छबिना मिरवणुकीदरम्यान आमदार सुरेश धस यांनी स्वतः पारंपरिक ढोल वाजवत फडातील नृत्यांगनांच्या तालावर ताल धरत त्यांनीही नृत्य केले. एकीकडे वाद्यांचा गजर, तर दुसरीकडे घुंगरांची छमछम, असा सुरेल संगम यावेळी पाहावयास मिळाला. त्यांच्या सहभागामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला. स्वर्गीय रामचंद्र धस यांनी ही जपलेली ही परंपरा पुढे नेण्याचे काम आमदार धस हे करत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले, तर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन हे या यात्रेत झाल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. या सर्वांची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्याची मागणी आता समोर आली आहे.