

नेकनूर : आठवडाभर सातत्याने सकाळी पडणाऱ्या धुईने नेकनूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून हजारो हेक्टर वरील पीक धोक्यात आले आहे. फवारणी करुनही कांदा उभारी घेण्याची शक्यता नसल्याने यावर नांगर फिरवण्याचा सूर शेतकऱ्यांतुन व्यक्त होत आहे. भाव वाढल्याने यावर्षी उत्पादन क्षेत्र वाढले असताना शेतकऱ्यांसमोर आठवडाभरातील धुईने संकट ओढावले आहे.
बीड, केज तालुक्यातील नेकनूर परिसरात असणारी बहुतांश गावे कांदा उत्पादक म्हणून ओळखली जातात यामध्ये नेकनूर, सावंतवाडी, बाळापूर आंबील वडगाव, कुंभारी, चाकरवाडी, बंदेवादी, वैतागवाडी, सफेपुर जैताळवाडी, धावज्याचीवाडी, पांढऱ्याचीवाडी, तांदळ्याचीवाडी, नारेवाडी, मुंडेवाडी, वाघेभाबळगाव आदी परिसरातील गावांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो मागच्या महिना, दीड महिन्यात लागवड झालेल्या हजारो हेक्टरवरील कांद्याला जाळ धुईने घेऱ्यात घेतले.
त्यामुळे जोमदार दिसणारे कांदा पीक करपले. लागोपाठ रोजच आठवडाभर आलेली घुईरुपी विघ्न शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी टाकणारे ठरले. आवश्यक असलेली फवारणी करूनही पाहिजे तेवढा फरक नसल्याने आता यावर नांगर फिरवावा लागेल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.कमी काळात निघणारे पीक शिवाय भाव चांगले राहिले तर लाखों पदरात पडत असल्याने मागच्या काही वर्षात बीड आणि केज तालुक्यातील बहुतांश गावे कांदा उत्पादक म्हणून ओळखले जाऊ लागले.
एलोरा वडर, फुरसुंगी, बसमत ७८० अशा विविध जातीचे बियाणे ते रोप विक्रीचा व्यवसाय या भागात मागच्या दीड दोन महिन्याच्या काळात वेग धरून असतो. कांद्याने चाळीस रुपयांचा टप्पा पार केल्याने यावर्षी रोपांनी चांगलाच भाव खाल्ला लागवडीचा खर्च वाढला मात्र आठवड्याच्या जाळधुईने शेतकऱ्याचे सगळे गणितच बिघडून टाकले मोठा खर्च करूनही पीक वाया जात असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
लागवड केलेल्या कांद्याला दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होत असताना आठवड्यात आलेली धुई जोमातील पिकाचे नुकसान करणारी ठरली कांदा करपून गेला एक्करी बाराशे ते पंधराशे रुपयांचे औषधे फवारणी केली तरी परिस्थिती सुधारली नाही. लागवडीपासून आतापर्यंत मोठा खर्च झालेला आहे तो कसा भरून निघणार हा प्रश्न पडला असल्याचे मुंडेवाडी येथील शेतकरी श्रीराम मुंडे यांनी सांगितले.