

केज : सराफ दुकानात चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने गिऱ्हाईक बनून आलेल्या चार महिलांनी दुकानातील ५८ हजार किमतीची चांदी चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चारही महिलांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दि. ११ जून रोजी दुपारी १:०० वाजताच्या सुमारास केज येथील कानडी रोडवरील कुंदन बालासाहेब जोगदंड यांच्या श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात अनोळखी चार महिला आल्या. त्यांनी पायातील चांदीची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने कुंदन जोगदंड यांची नजर चुकवून ७ जोड लांबविले. त्या महिला दुकानातून निघून गेल्या नंतर चोरीचा प्रकार कुंदन जोगदंड यांच्या लक्षात आला. दरम्यान, कुंदन जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवर त्या चार अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुपके आणि त्यांच्या पथकाने या चोरी प्रकरणी बीड तालुक्यातील मुर्शदपूर येथून सुमन पोपट येळवे, (वय,५२ वर्षे), कलावती मोतीराम केंगारे, (वय,५६ वर्ष), बबीता भाऊराव केंगारे, (वय,६१ वर्षे), द्वारकाबाई सतिष बोराडे (वय,४० वर्ष) या चौघींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १८ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.