

बीड : पुढारी वृत्तसेवा
सतीश भोसले याचे वनविभागाच्या जागेमध्ये अनाधिकृत घर होते. ते वन विभागाने कारवाई करत (गुरुवार) दुपारी पाडले. यानंतर रात्री उशिरा त्याच्या घराच्या परिसरात असलेले साहित्य अज्ञात व्यक्तींनी फेटून दिल्याची तक्रार भोसले कुटुंबाने केली. तसेच यावेळी महिलांना देखील मारहाण झाल्याचे सांगितले.
शिरूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या झापेवाडी शिवारामध्ये सतीश भोसले यांचे घर होते. हे घर वनविभागाच्या जागेवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभाग, महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या घरातील साहित्य बाहेर काढत बांधकाम काढून टाकले होते. जवळपास 40 अधिकाऱ्यांनी चार तास ही कारवाई केली. त्यानंतर काही साहित्य सतीश भोसले यांच्या घराच्या बाहेरच पडून होते. तसेच त्याच्या कुटुंबातील लोक देखील त्या ठिकाणी थांबले होते.
रात्री उशिरा या ठिकाणी काही अज्ञात लोक दाखल झाले. त्यांनी हे घराचे साहित्य पेटवून दिले. तसेच महिलांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात हलवले. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.