

The bride ran away with her lover on the second day after the wedding
गौतम बचुटे : केज
अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दि. ९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक जणांची उपस्थिती होती.
या विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यांना सुखी संस्काराच्या शुभेच्छा दिल्या, पण यावेळी वधूच्या मनात वेगळेच काही असावे. ९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नववधू- वराने जोडीने देवदर्शन केले. त्यानंतर दि. ११ मे रोजी तिला मुराळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र त्या नंतर तिने रात्री शौचाला जाण्याच्या बहाण्याने भाजाईचा मोबाईल घेतला आणि त्याद्वारे आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराशी असलेल्या संपर्क साधला. त्या नंतर ती घरात झोपली आणि इतर नातेवाईक अंगणात झोपी गेले. त्या नंतर दि. १२ मे रोजी तिच्या आईला घरातील लाईट बंद असल्याचे आढळून आल्याने तिने घरात जाऊन पाहिले असता, मुलगी आढळून आली नाही.
तिचा शोध घेतला असता, नववधू आढळून न आल्याने ओली हळद अंगाला लागलेल्या नवरीच्या भावाने केज पोलीस ठाण्यात बहीण हरवल्याची तक्रार दिली आहे. प्रियकरासोबत पळून जाताना तिने नवऱ्याने लग्नात घातलेले झुंबर, मंगळसूत्र यासह एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह पोबारा केला आहे.
नवरी मुलीने दागिने आणि एटीएम कार्डसह पलायन केल्याने त्यांचे आधी तसे काही ठरले होते का? असा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान भावाने बहिण हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मात्र या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
अशा परिस्थितीत उपवर मुलामुलींना विश्वासात घेवून पालकांनी बोलणे आवश्यक आहे. तसेच तरूण-तरणींनीही आपल्या घरच्यांना आपल्याला हव्या असणाऱ्या भविष्यातील जोडीदाराविषयी बोलणे गरजेचे आहे. उपवर मुला-मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या योग्य संवादातूनच अशा घटना टाळता येउ शकतात.